Sidhu MooseWala: सुप्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला(27) यांची काल(रविवार) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी राज्य सरकारने मूसेवाला यांची सुरक्षाव्यवस्था काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अंदाधूंद गोळीबार केला.
पंजाबचे पोलीस महासंचालक(DGP) व्ही.के. भवरा यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, मुसेवाला यांची हत्या टोळ्यांमधील परस्पर वैमनस्यातून झाली आहे. या हत्येत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले. घटनेच्या तीन तासांनंतर गँगस्टर गोल्डी ब्रारने फेसबुक पोस्टद्वारे हत्येची जबाबदारी स्वीकारली. गोल्डी ब्रार हा सध्या कॅनडामध्ये आहे. मूसेवाला यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक(SIT) स्थापन करण्यात येणार आहे.
अशी झाली हत्या...हत्येबाबत सांगताना डीजीपी म्हणाले की, सिद्धू मुसेवाला यांच्याकडे खाजगी बुलेटप्रूफ वाहन होते, परंतु घटनेच्या वेळी त्यांनी ते सोबत घेतले नव्हते. मूसेवाला यांनी आपले घर सोडल्यानंतर समोरुन 2 वाहने आली आणि त्यांनी मूसेवालांच्या गाडीवर अंदाधूंद गोळीबार केला. यादरम्यान 25-30 गोळ्या चालवण्यात आल्या. यातील अनेक गोळ्या मूसेवाला यांच्या शरीरीत घुसल्या. यानंतर रुग्णालयात नेले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
रशियन AN-94 रायफलचा वापरविशेष म्हणजे, सिद्धू मूसेवालांच्या हत्येत रशियन बनावटीच्या AN 94 रायफलचा(Russian Assault Rifle) वापर करण्यात आला आहे. पंजाबच्या गँगवारमध्ये एएन-94 चा वापर पहिल्यांदाच पाहण्यात आलाय. पोलिसांनी सांगितल्यानुसार, या हत्येत 8 ते 10 हल्लेखोरांचा हात असू शकतो. या घटनेत मूसेवाला यांच्यासोबत असलेल्या दोन साथीदारांनाही गोळ्या लागल्या आहेत, त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.