सिद्धू यांना शिक्षा भोगावीच लागेल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:17 AM2018-04-13T05:17:01+5:302018-04-13T05:17:01+5:30
उत्तम क्रिकेटपटू, समालोचक आणि टीव्ही वाहिन्यांवरील विनोदी कार्यक्रमांद्वारे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणारा नवज्योत सिद्धू राजकारणात गेल्यानंतर मात्र भलताच अडचणीत सापडला आहे.
- बलवंत तक्षक
चंदीगड : उत्तम क्रिकेटपटू, समालोचक आणि टीव्ही वाहिन्यांवरील विनोदी कार्यक्रमांद्वारे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणारा नवज्योत सिद्धू राजकारणात गेल्यानंतर मात्र भलताच अडचणीत सापडला आहे. तो पंजाबमधील मंत्रिमंडळात असला तरी त्याच सरकारने नवज्योत सिद्धू यांना एका जुन्या प्रकरणात तीन वर्षे शिक्षा व्हायलाच हवी, असे सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.
नवज्योत सिद्धू याला १९८८ साली एका कार अपघात प्रकरणात न्यायालयाने तीन वर्षे शिक्षा सुनावली होती. त्या प्रकरणात त्याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला असल्याने तो मोकळेपणे फिरू शकतो. पण त्या प्रकरणात त्याला दिलेली तीन वर्षांची शिक्षा कायम ठेवावी, असे पंजाब सरकारने न्यायालयाला सांगितले आहे. दुसरीकडे पीडित कुटुंबीयांनी सिद्धूची शिक्षा वाढवण्यात यावी, अशी भूमिका घेतली आहे.
पंजाबात कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात सिद्धू असला तरी त्या दोघांतून विस्तव जात नाही. दोघे एकमेकांविषयी चांगले बोलत असले, जाहीर कार्यक्रमात गळ्यात गळे घालत असले तरी त्यांच्यात फारसे सख्य नाही. त्यातच नवज्योत सिद्धू यांनी शिक्षा भोगायलाच हवी, असे पंजाब सरकारने म्हटल्यामुळे दोन नेत्यांतील वाद पराकोटीला जाईल, अशी चर्चा आहे. सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमधील नगरपालिका, महापालिका काँग्रेसने जिंकल्या. पण महापौर निवडताना सिद्धू यांना अजिबातच विचारात घेतले नाही. अमृतसरमध्ये तर त्यांना नको असलेल्या व्यक्तीला महापौर करण्यात आले. एकूणच मंत्री असलेले सिद्धू काँग्रेसमध्ये अद्याप अस्थिरच आहेत. त्यातच पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचे आसन अधिकच अस्थिर होण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसमधील या वादाचा फायदा घेत भाजपाने सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपाचे केंद्रीय सचिव तरुण चुघ म्हणाले की, आपल्याच मंत्र्याच्या विरोधात पंजाब सरकार गेले आहे. असे प्रथमच घडते आहे. त्यामुळे सिद्धू यांनी राजीनामा द्यावा वा मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदावरून दूर करावे.
>काँग्रेसमध्ये घेण्यावरून होती नाराजी
आधी भाजपामध्ये असलेले नवज्योत सिद्धू हे काँग्रेसमध्ये आले राहुल गांधी यांच्यामुळे. त्याआधी ते आम आदमी पक्षात जाणार, अशी चर्चा होती. सिद्धू व केजरीवाल यांच्यात बोलणीही सुरू होती. आपने त्यांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन न दिल्याने आणि पंजाबमध्ये आपला सत्ता मिळेल, अशी खात्री न वाटल्यामुळे सिद्धू काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांच्या स्वागताला स्वत: कॅप्टन अमरिंदर सिंग अजिबात उत्सुक नव्हते, या इतिहासाचा इथे उल्लेख करणे गरजेचे आहे.नवज्योत सिद्धू यांना शिक्षा झाली असल्याने म्हणजेच ते दोषी ठरले असल्याने त्यांना मंत्री करण्यास कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह काँग्रेसमधील अनेक नेत्यांचा विरोध होता. पण शिक्षेला न्यायालयाने दिलली स्थगिती व मिळालेला जामीन यांमुळे त्यांना मंत्री करण्यात काहीही कायदेशीर अडचण नाही, असा सल्ला कायदेतज्ज्ञांनी काँग्रेसला दिला होता. त्यामुळे सिद्धू मंत्री झाले. पण ते किती काळ टिकणार, हा प्रश्नच आहे.