कर्तारपूर साहिबला जाण्यासाठी शीख भाविकांना व्हिसाची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 05:02 AM2019-07-15T05:02:02+5:302019-07-15T05:02:07+5:30
भारतातील शीख भाविकांना पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब येथे जाण्यासाठी आता व्हिसाची गरज लागणार नाही. त्या ठिकाणी भारतातून दररोज पाच हजार भाविकांना जाऊन दर्शन घेता येईल.
अटारी/वाघा : भारतातील शीख भाविकांना पाकिस्तानातील कर्तारपूर साहिब येथे जाण्यासाठी आता व्हिसाची गरज लागणार नाही. त्या ठिकाणी भारतातून दररोज पाच हजार भाविकांना जाऊन दर्शन घेता येईल.
कर्तारपूर कॉरिडॉरशी निगडीत अनेक महत्त्वाच्या बाबींवर अंतिम निर्णय घेण्याकरिता भारत व पाकिस्तानच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची दुसºया टप्प्यातील बैठक अटारी-वाघा सीमेवर रविवारी पार पडली. त्यात भारताच्या अनेक मागण्या पाकने मान्य केल्या.
या गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी येणाºया भारतीयांच्या भावना भडकाविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखावे, गुरुद्वारामध्ये भारतीय राजदूतावासाच्या कर्मचाऱ्यांना हजर राहाण्याची परवानगी मिळावी, सीमेलगत कर्तारपूर कॉरिडॉरला जोडणारा पूल भारताप्रमाणे पाकिस्ताननेही लवकरात लवकर बांधावा, अशा मागण्या भारताने या बैठकीत केल्या. पाकच्या बाजूने रावी नदीवर असा पुल बांधण्याच्या कामात अजून फारशी प्रगती झालेली नाही. या बैठकीला भारताच्या गृह मंत्रालयाचे सहसचिव एस. सी. एल. दास, परराष्ट्र मंत्रालय, पंजाब सरकार, नॅशनल हायवे आॅथॉरिटीज आॅफ इंडियाचे अधिकारीही उपस्थित होते.
>आॅक्टोबर अखेरीस काम पूर्ण
कर्तारपूर कॉरिडॉरचे भारताच्या हद्दीतील बांधकाम वेगाने सुरू आहे. हे बांधकाम ३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. इथे ४ लेनच्या राष्ट्रीय महामार्गाची बांधणी सुरू आहे. गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंतीवर्षात तसेच विशेष प्रसंगी भारतातून रोज अतिरिक्त १० हजार भाविकांना कर्तारपूरला येण्याची परवानगी पाककडून मिळावी, असा आग्रह आहे.