माध्यमांनी माझ्यावर कधीपासून टीका सुरू केली?; राहुल गांधींनी सत्य आणलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 08:05 AM2022-12-05T08:05:38+5:302022-12-05T08:06:03+5:30
२००४ ते २००८-०९ या कालावधीत मी पहिल्यांदा राजकारणात आलो, तेव्हा संपूर्ण भारतातील सर्व माध्यमे माझी २४ तास प्रशंसा करीत असत.
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी रविवारी २.१५ मिनिटांची व्हिडीओ क्लिप समोर आणत, त्यात आपल्या सुरुवातीच्या वर्षांत रात्रंदिवस स्तुती करणारे माध्यमांचे कव्हरेज नंतर वैयक्तिक हल्ल्यांपर्यंत कसे बदलत गेले, हे दाखवले आहे. याद्वारे माध्यमांतील प्रतिमेबद्दलचे सत्य उलगडले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
माझ्या प्रतिमेचे माध्यमांतील सत्य काय आहे, हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला असून, राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले असले तरी अखेर सत्य पुढे आले आहे.
२००४ ते २००८-०९ या कालावधीत मी पहिल्यांदा राजकारणात आलो, तेव्हा संपूर्ण भारतातील सर्व माध्यमे माझी २४ तास प्रशंसा करीत असत. त्यानंतर जमीन आणि गरिबांचा जमिनीवरील हक्क, हे मुद्दे मांडल्याच्या क्षणापासून संपूर्ण माध्यमांचा तमाशा सुरू झाला. महाराजांकडून भारताची संपत्ती राज्यघटनेद्वारे जनतेकडे हस्तांतरित केली होती आणि आता भाजप ही प्रक्रिया उलट दिशेने नेत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
योग्य दिशेने काम...
माझे प्रतिमाहनन करण्यासाठी त्यांनी हजारो कोटी रुपये खर्च केले. माझ्या प्रतिमाहननावर ते जेवढा खर्च करीत आहेत, ते तेवढेच मला सशक्त करीत आहेत. तुमचा लढा मोठ्या शक्तीशी असेल तर वैयक्तिक हल्लाबोल करण्यात येतो. माझ्यावर असाच हल्लाबोल करण्यात येत आहे. त्यामुळे मी योग्य दिशेने काम करीत आहे असे मी समजतो, असेही राहुल गांधी म्हणाले.