सिंगरौली : कोरोना व्हायरसवर (Coronavirus) मात करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी काही ठिकाणी विविध ऑफर्स दिल्या जात आहेत, तर काही ठिकाणी सक्ती केली जात आहे. यात आता मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एका जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाची लस न घेतल्यास एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश काढले आहेत.
मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील लोक लसीचे दोन्ही डोस टाळू शकत नाहीत. त्यांनी असे केल्यास त्यांच्यावर सामान्य कारवाईसह एफआयआरही दाखल होईल. यासाठी जिल्हाधिकारी राजीव रंजन मीणा यांनी कडक आदेश काढले आहेत. आदेशानुसार, 15 डिसेंबरपर्यंत दोन्ही डोस न घेतल्यास सार्वजनिक कार्यक्रम, हॉटेल, खासगी संस्था किंवा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार हॉटेल, खासगी कंपन्या अशा अन्य संस्थांमध्ये दोन्ही डोस न घेतल्यास व्यक्तीला काम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. 15 डिसेंबरनंतर ज्यांना वैद्यकीय सल्ल्याने लस न घेण्याबाबत सांगितले आहे, त्यांना यातून दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापूर्वी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानेही असाच आदेश काढला होता. ज्या कुटुंबातील सदस्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत, त्याच कुटुंबाला रेशन दिले जाईल, असे विभागाने सांगितले होते.
इंदूरच्या लोकांनाही कोरोना लसीचे दोन्ही डोस लवकर घ्यावेत, अन्यथा 30 नोव्हेंबरनंतर तुम्हाला दूध, रेशन किंवा जीवनावश्यक वस्तू मिळणार नाहीत. एवढेच नाही तर देव दर्शन घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही मंदिराचा दरवाजा ओलांडू शकणार नाही. इंदूरच्या सर्व व्यापारी संघटना आणि मंदिर व्यवस्थापकांनी हा निर्णय घेतला आहे.
खरंतर, कोरोनाच्या तिसर्या लाटेची भीती घालवण्यासाठी इंदूर प्रशासनाने लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून मोहीम सुरू केली आहे, त्याअंतर्गत सर्व व्यापारी संघटना, सामाजिक संस्था, मंदिर व्यवस्थापन आणि अनेक संघटनांना कोरोना योद्धा म्हणून मैदानात उतरवले आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबरनंतर लसीच्या दोन्ही डोसचे प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय ग्राहक किंवा विक्रेत्याला आत प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय व्यापारी संघटनेने घेतला आहे.
याचबरोबर, ज्यांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले नाहीत, अशा लोकांना मंदिरांमध्ये प्रवेश मिळणार नाही. इंदूरमध्ये शंभर टक्के लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे आणि साठ टक्के लोकांना दुसरा डोस मिळाला आहे.