बंगळुरू, दि. 17 - गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) लेखक विक्रम संपथ यांचा जबाब नोंदवला आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी माझी चौकशी केली जाते आहे. परिणामी मी आणि माझे वृद्ध आई- वडील तणावात आहोत, या गोष्टीला काही अर्थ आहे का? असा प्रश्न विक्रम संपथ यांनी विचारला आहे.विक्रम संपथ यांची शुक्रवारी चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. लंडनहून परतल्यावर दोन दिवसांनी विशेष तपास पथकाचे अधिकारी माझ्या घरी आले. त्यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी माझा जबाब नोंदवून घेतला अशी माहिती संपथ यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. कायद्याचे पालन करणे हे आपले कर्तव्य असल्याने मी त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. पण एसआयटी अधिकाऱ्यांचा माझी चौकशी करण्यामागचा दृष्टीकोन मला पटला नाही. मी गौरी लंकेश यांच्या विरोधात लेख लिहिला होता हे मला मान्य. पण या लेखाला गौरी लंकेश यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. गौरी लंकेश यांच्या विरोधात मी लेखन केले असले तरीही गौरी लंकेश यांच्या लिखाणामुळे माझी बदनामी झाली, असाही आरोप संपत यांनी केला आहे. ज्या लेखकांनी गौरी लंकेश यांच्यावर टीका केली होती त्या सगळ्यांना तपास पथकाकडून प्रश्न विचारले जातील का? असाही प्रश्न संपथ यांनी उपस्थित केला आहे.त्या एक निडर पत्रकार होत्या, त्यांची हत्या दुर्दैवी आहे. त्यांनी पंतप्रधानांच्या विरोधात लिहितानाही धाडसी भूमिका घेतली होती. मात्र त्यांच्या हत्येप्रकरणी माझी चौकशी केली जातेय, परिणामी मी आणि माझे वृद्ध आई- वडील तणावात आहोत, या गोष्टीला काही अर्थ आहे का? असा प्रश्न विक्रम संपथ यांनी विचारला आहे.2015 साली देशात असहिष्णुतेचे वातावरण आहे असा आरोप करत अनेक लेखक आणि साहित्यिकांनी पुरस्कार वापसीची मोहिम हाती घेतली होती. याच संदर्भात गौरी लंकेश यांनी संपथ यांच्याविरोधात एक लेख लिहिला होता. ज्यानंतर बेंगळुरू साहित्य संमेलनाचे वातावरण बिघडले. काही कन्नड लेखकांनी या साहित्य संमेलनात सहभाग घेण्यासही नकार दिला होता. गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबरच्या रात्री 8 ते 8.30 च्या दरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या. 5 सप्टेंबर रोजी गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गौरी लंकेश आपली गाडी पार्क करुन घराच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. गौरी लंकेश यांनी दरवाजाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला असता, तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यापैकी एक गोळी मानेवर, एक छातीवर, तर एक त्यांच्या कपाळावर लागली. तर चार गोळ्या घराच्या भिंतीवर लागल्या.
गौरी लंकेश आणि कर्नाटकातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत एम एम कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये अजून एक समान धागा असल्याचंही फॉरेन्सिकच्या अहवालात निष्पन्न झालं आहे. गौरी लंकेश आणि एम एम कलबुर्गी यांच्या हत्येत वापरण्यात आलेलं पिस्तूल एकाच बनावटीचं असल्याचं फॉरेन्सिकच्या प्राथमिक चाचणीत समोर आलं आहे. दोघांच्या हत्येसाठी 7.65 मिमी देशी बनावटीचं पिस्तूल वापरण्यात आलं होतं. फॉरेन्सिकने गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर घटनास्थळावरुन बुलेट्स आणि काडतुसं ताब्यात घेतली होती.
तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या बुलेट्स आणि काडतुसांवर असणा-या बॅलिस्टिक सिग्नेचरची तुलना कलबुर्गी यांच्या हत्येवेळी सापडलेल्या बुलेट्स आणि काडतुसांशी केली. या दोन्ही हत्यांमध्ये संबंध असल्याचा संशय पोलिसांना होता. चाचणीनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही हत्यांमध्ये एकाच बनावटीचं पिस्तूल वापरण्यात आल्याचं नक्की झालं आहे. यामुळे या दोन्ही हत्यांमागे समान लोक सामील असण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.