भटक्या कुत्र्यांची दहशत, लहान मुलांच्या रस्त्यावर एकटं फिरण्यावर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 10:50 AM2018-05-14T10:50:14+5:302018-05-14T10:50:14+5:30
खैराबाद भागात कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलीच्या मृत्यूनंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात हायअलर्ट जारी केला आहे.
सीतापूर- उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात कुत्र्यांची दहशत कमी होत नाहीये. रविवारी 10 वर्षाच्या मुलीचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. खैराबाद भागात कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलीच्या मृत्यूनंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात हायअलर्ट जारी केला आहे. तेथे कुठल्याही लहान मुलाला घराबाहेर निघण्यावर बंदी घालण्यात आली आहे. लहान मुलं घरातील मोठ्या सदस्याबरोबरच घराबाहेर पडतील, असा नियम घालून देण्यात आला आहे.
नोव्हेंबर 20107पासून ते आत्तापर्यंत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एकुण 13 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 1 मे पर्यंत सात मुलं गंभीर जखमी झाली आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीतापूरमध्ये जाऊन मृत मुलांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर 48 तासाच्या आतच एका मुलाचा कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यामुळे घरातील एकातरी मोठ्या सदस्याने लहान मुलगा बाहेर जाताना त्याच्याबरोबर असावं, अशी सूचना करण्यात आली आहे.
खैराबाद ठाण्याअंतर्गत येणाऱ्या महेशपूर-चिल्लावर गावात रविवारी सकाळी 10 वर्षीय मुलगी रीना तिच्या तीन मैत्रिणींबरोबर आंबे वेचायला गेली होती. त्यावेळी कुत्र्यांच्या एका झुंबडीने मुलींवर हल्ला केला. कुत्र्यांना येताना पाहून इतर तिघी तेथून पळाल्या पण रीना कुत्र्यांच्या तावडीत सापडली. रीनाचा आवाज ऐकुन गावातील लोक घटनास्थळी आली व त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेचा गावातील स्थानिक लोकांनी जोरदार निषेध करत सरकारवर जोरदार टीका केली. एकामागे एक मुलांचे कुत्र्यांच्या हल्ल्ल्यात मृत्यू होत असताना जिल्हा प्रशासन काहीही करू शकत नाही, अशी टीका तेथिल लोकांनी केली.