देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक म्हणजे UPSC उत्तीर्ण होणं अत्यंत अवघड आहे. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. IAS अधिकारी एस शिवागुरू प्रभाकरण यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देतो. ज्यांनी गरीब परिस्थिती आणि सुविधांचा अभाव असताना देखील UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. शिवागुरू प्रभाकरण हे यूपीएससीची तयारी करणाऱ्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहे.
शिवागुरू प्रभाकरण यांच्या घरची परिस्थिती अत्यंत वाईट होती. दारूचं व्यसन असल्यामुळे वडिलांनी सर्व काही विकून टाकलं होतं, परंतु आई आणि बहीण मुलाला अधिकारी बनवण्यासाठी बांबूच्या टोपल्या विणत असत. यानंतर आयएएस होऊन मुलाने संपूर्ण कुटुंबाचं नशीब पालटलं आहे. आयएएस अधिकारी एस शिवागुरू प्रभाकरण मूळचे तामिळनाडूच्या तंजावूर जिल्ह्यातील आहेत.
2017 मध्ये एम शिवागुरू प्रभाकरण यांनी चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत 101 वा क्रमांक मिळवला होता. सुरुवातीला प्रभाकरण यांना तीन वेळा अपयश आलं पण त्यांनी हार मानली नाही. प्रभाकरण यांच्या या यशामुळे गावात आनंदाची लाट उसळली आहे. एक काळ असा होता की, घरच्या जबाबदाऱ्यांमुळे प्रभाकरण यांनी बारावीनंतर अभ्यास सोडला आणि काम करायला सुरुवात केली.
UPSC ची तयारी करण्यापूर्वी शिवागुरू प्रभाकरण लाकूड कापण्याचं काम करायचे. काम केल्यानंतर प्रभाकरण रेल्वे स्टेशनवर अभ्यास करायचे. येथे शिकत असताना त्यांना मागासलेल्या लोकांसाठी प्रशिक्षणाची सुविधा देणाऱ्या सेंट थॉमस माऊंटची माहिती मिळाली. यामुळे प्रभाकरण यांचे आयुष्य बदलले. त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला, त्यानंतर एमटेकमध्ये टॉप रँक मिळाला. आज अधिकारी झाल्यावर प्रभाकरण यांनी आपल्या धाकट्या भावाला शिक्षण दिले आणि नंतर बहिणीचे लग्न लावून दिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.