मंदिरातील पुजाऱ्यांच्या यादीत सहा दलितांचा सहभाग; केरळच्या त्रावणकोर देवस्वाम भरती बोर्डाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 08:43 AM2017-10-07T08:43:49+5:302017-10-07T09:03:23+5:30
त्रावणकोर देवस्वाम भरती मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेऊन इतिहास तयार केला आहे.
हिरुवनंतपुरम- तिरूअनंतपुरममधील प्रसिद्ध त्रावणकोर मंदिराकडून ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. त्रावणकोर देवस्वाम भरती मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेऊन इतिहास तयार केला आहे. या देवस्वाम भरती बोर्डाकडून पुजाऱ्यांच्या यादीत सहा दलित व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. मंदिरासाठी तयार करण्यात आलेल्या पुरोहितांच्या यादीत ब्राम्हणेतर 36 इतर जातीच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला. यामधील सहा जण दलित आहेत. त्रावणकोर मंदिर प्रशासनाने याआधी ब्राम्हणांव्यतिरिक्त इतर जातींच्या व्यक्तींची पुजारी म्हणून नेमणूक केली होती.पण यंदा पहिल्यांदाच दलित व्यक्तींची निवड पुजारी म्हणून करण्यात आली आहे. समितीने सहा दलितांची पुजारी पदासाठी निवड केली आहे.
तिरूअनंतपुरममधील त्रावणकोर मंदिराच्या निवड समितीने गुरूवारी 62 पुजाऱ्यांची यादी निश्चित केली आहे. त्यामध्ये 36 जण इतर जातींचे आहेत. लेखी परीक्षा आणि मुलाखत घेऊन राज्य सार्वजनिक सेवा आयोगाकडून ही नेमणूक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत त्रावणकोर मंदिर प्रशासनाकडून पुजाऱ्यांची नेमणूक केली जात होती, त्यामुळे ब्राम्हणेतर इतर जातीच्या व्यक्तींच्या शेवटच्या यादीत सहभाग होत नव्हता. या नव्या यादीत 26 ब्राम्हण पुरोहितांचा सहभाग आहे.
'ब्राम्हणेतर व्यक्तींच्या नियुक्तीला आमचा विरोध नाही. पण ज्या लोकांची पुजारी म्हणून नियुक्ती झाली त्यांना तांत्रिक मंत्रांची व्यवस्थित माहिती असावी. आरक्षणाच्या निकषांवर नियुक्ती व्हायला नको. तुमचं ज्ञान आणि मंदिराकडून आत्मसात केलेल्या प्रणालीवरील विश्वासावर निवड होणं अपेक्षित आहे, असं ऑल इंडिया ब्राम्हण फेडरेशनचे अक्कीरामण कालिदासन भट्टाथ्रीरीपद यांनी म्हंटलं आहे.
देवस्वाम कोर्डाचे मंत्री कडकमपल्ली सुरेन्द्रन यांनी मेरिटच्या आधारे पुजाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले होते. याचं निर्देशांचं पालन करून लेखी परीक्षा घेण्यात आली होती. लेखी परीक्षेच्या आधारे मेरिट लिस्ट आणि आरक्षणाची लिस्ट तयार करण्यात आली.
बोर्डाचे चेअरमन राजागोपालन नायर यांच्या माहितीनुसार, एससी, एसटी आणि इतर वर्गातील व्यक्तीना मंदिरात पुजारी बनवण्यासाठी आरक्षण देण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे. मेरिट लिस्टच्या आधारे त्यांनी आपली जागा बनविली आहे. त्रावणकोर देवस्वाम बोर्ड 1949मध्ये अस्तिस्वात आला आहे. गेल्या अनेक दशकांपासून पुजाऱ्यांच्या नियुक्तीसाठी आरक्षणाची मागणी लावून धरण्यात आली होती.