आयआयटी मुंबईसह सहा शिक्षण संस्था ‘प्रतिष्ठित’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 05:27 AM2018-07-10T05:27:14+5:302018-07-10T05:27:27+5:30
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोमवारी आयआयटी मुंबईसह तीन सरकारी आणि तीन खासगी संस्थांना ‘प्रतिष्ठित संस्थां’चा दर्जा दिला आहे.
नवी दिल्ली : मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोमवारी आयआयटी मुंबईसह तीन सरकारी आणि तीन खासगी संस्थांना ‘प्रतिष्ठित संस्थां’चा दर्जा दिला आहे. यामुळे या संस्थांना जागतिक स्तरावरील विद्यापीठाच्या स्वरूपात आणि स्वायत्त म्हणून सादर करण्यास मदत होणार आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालय पुढील पाच वर्षात तिन्ही सरकारी संस्थांना १००० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. खासगी संस्था सरकारी निधीसाठी पात्र असणार नाहीत. सरकारने ज्या संस्थांना प्रतिष्ठित संस्थांचा दर्जा दिला आहे त्यात आयआयटी दिल्ली, आयआयटी मुंबई, बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, मणिपाल अॅकॅडमी आॅफ हायर एज्युकेशन, बिट्स पिलानी आणि खासगी क्षेत्रातील जिओ इन्स्टिट्यूट रिलायन्स फाउंडेशन या संस्थांचा समावेश आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालय १० सरकारी आणि १० खासगी अशा २० प्रतिष्ठित संस्थांची निवड करणार आहे. हे पाऊल त्याचाच एक भाग आहे. या संस्थांना पूर्ण शैक्षणिक आणि प्रशासकीय स्वायत्तता राहील.
स्वायत्ततेमुळे होणार फायदा
या संस्थांना नवे अभ्यासक्रम, विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश, विदेशी शैक्षणिक संस्थांसोबत सहकार्य करण्याची स्वायत्तता मिळणार आहे. देशात आज ८०० विद्यापीठे आहेत. मात्र, यातील एकही संस्था जगातील पहिल्या १०० अथवा २०० मध्ये नाही.