सहा नव्या पदव्युत्तर वैद्यकीय पदविकांना मिळाली मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 06:32 AM2020-08-22T06:32:57+5:302020-08-22T06:33:09+5:30
वैद्यकशाखेतील विशेषज्ञ म्हणून अर्हता प्राप्त करण्याच्या नव्या संधी मिळतील व खास करून ग्रामीण भागांमध्ये अधिक संख्येने स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध होतील.
नवी दिल्ली : आंग्लवैद्यकशास्त्राच्या सहा शाखांमधील दोन वर्षांच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. यामुळे पदवीधर डॉक्टरांना एखाद्या वैद्यकशाखेतील विशेषज्ञ म्हणून अर्हता प्राप्त करण्याच्या नव्या संधी मिळतील व खास करून ग्रामीण भागांमध्ये अधिक संख्येने स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध होतील.
मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाशी सल्लामसलत करून मंत्रालयाने यासंबंधीची अधिसूचना काही दिवसांपूर्वी राजपत्रात प्रसिद्ध केली. नॅशनल बोर्ड आॅफ एक्झामिनेशन्सतर्फे अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेऊन पदविका दिल्या जातील. हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा असेल व एमबीबीएस पदवीधारक कोणीही डॉक्टर त्यासाठी प्रवेश घेण्यास पात्र असेल.
शंभरहून अधिक खाटांची सोय असलेले व वरिष्ठ 'स्पेशालिस्ट' डॉक्टर सेवेत असलेले कोणतेही सर्व आवश्यक सोयीसुविधांनी परिपूर्ण असे सरकारी अथवा खासगी रुग्णालय या पदविकांसाठी उमेदवारांना प्रशिक्षण देऊ शकेल. आतापर्यंत फक्त मेडिकल कौन्सिल व एनबीई यांच्या एमडी, एमएस, डीएनबीयासारख्या पदव्युत्तर पदव्यांना मान्यताप्राप्त वैद्यकीय अर्हता मानले जात असे. या पदव्युत्तर पदव्यांसाठी देशभरात ५० हजार प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटीला दरवर्षी सरासरी १.७० लाख पदवीधर डॉक्टर बसत असतात. म्हणजे ज्या १.२० लाख इच्छुकांना पदव्युत्तर पदवीला प्रवेश मिळू शकत नाही त्यांना या पदव्युत्तर पदविकांचा पर्याय उपलब्ध होईल. यामुळे आणखी किमान ३० ते ४० हजार जास्तीचे स्पेशालिस्ट डॉक्टर तयार होऊ शकतील. १.३० अब्ज लोकसंख्येच्या भारतात सध्या फक्त ४० हजार अॅनेस्थेशिओलॉजिस्ट उपलब्ध आहेत.
>नवे अभ्यासक्रम
डिप्लोमा इन अॅनेस्थेशिआॅलॉजी (डीए), डिप्लोमा इन पेडिआट्रिक्स (डीसीएच), डिप्लोमा इन फॅमिली मेडिसिन (डी. फॅम. मेडि.), डिप्लोमा इन आॅप्थॅल्मोलॉजी (डीओ), डिप्लोमा इन ईएनटी (डीएलओ), डिप्लोमा इन रेडिओ डायग्नॉसिस (डीएमआरडी) व डिप्लोमा इन ट्युबर क्युलॉसिस अॅण्ड चेस्ट डिसिज (डीटीसीडी). एनबीएकडून आॅगस्ट २०२० नंतर दिल्या जाणाºया या पदविकांना पदव्युत्तर वैद्यकीय अर्हता म्हणून मान्यता असेल.