पणजी - ‘आयएनएसव्ही तारीणी’ या शिडाच्या बोटीतून गेल्या सप्टेंबरमध्ये जगभ्रमंतीवर निघालेल्या भारतीय नौदलाच्या ६ महिला अधिका-यांना या प्रवासात प्रशांत महासागरात (पॅसिफिक ओशन) जोरदार वादळाचा सामना करावा लागल्याचे वृत्त आहे. फॉकलँड बेटाजवळ कूच करताना हे वादळ आले, परंतु त्यातून या अधिकारी सहीसलामत सुटल्या.
गेल्या १0 सप्टेंबर २0१७ रोजी गोव्यातील ‘आयएनएस मांडवी’ तळावरुन केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी या बोटीला बावटा दाखवून परिक्रमेचा शुभारंभ केला होता. आशियातील महिलांचा समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याचा ही पहिलाच प्रयत्न असून यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी चालू होती. स्वदेशी बनावटीच्या छोट्याशा शिडाच्या बोटीवर स्वार होऊन या महिला अधिकारी ‘नाविका सागर परिक्रमा’ अंतर्गत जग भ्रमंतीसाठी निघाल्या आहेत. हा संपूर्ण प्रवास २१,६00 सागरी मैल अंतराचा आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी १६५ दिवस लागणार आहेत. या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर पद्रपल्ली स्वाती, लेफ्टनंट ऐश्वर्या बोध्दापती, लेफ्टनंट शोरगप्पन् विजया, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे.
समुद्रमार्गे जगभ्रमंतीवर निघालेल्या या महिला अधिकारी दैनंदिन तत्त्वावर समुद्रातील हवामान, लाटा याविषयी भारतीय हवामान वेधशाळेला माहिती पुरवित असतात. हवामानाचा वेध घेण्यास यामुळे खात्याला मदत होणार आहे. खोल समुद्रातील प्रदूषणाबाबतही या अधिकारी निरीक्षणातून माहिती संकलित करीत आहेत.
या जगप्रवासासाठी महिला अधिका-यांना योग्य ते प्रशिक्षण दिलेले आहे. प्रशिक्षणाचा भाग म्हणून त्यांनी ‘आयएनएसव्ही तारीणी’ आणि ‘आयएनएसव्ही म्हादई’ या बोटींवरुन २0 हजार सागरी मैलांचा प्रवास केलेला आहे.
फॉकलँड बेटावरील पोर्ट स्टॅनली बंदर घेऊन पुढे ही शिडाची बोटी दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन ही बंदर घेईल. जगभ्रमंती करुन येत्या एप्रिलमध्ये ही बोट गोव्यात परतणार आहे.