स्नेहलता श्रीवास्तव ठरल्या लोकसभेच्या पहिला महिला महासचिव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 04:08 PM2017-12-15T16:08:52+5:302017-12-15T16:17:49+5:30
स्नेहलता श्रीवास्तव यांची लोकसभेच्या महासचिवपदी नियुक्ती झाली आहे. महासचिव म्हणून या पदावर विराजमान होणा-या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
नवी दिल्ली - स्नेहलता श्रीवास्तव यांची लोकसभेच्या महासचिवपदी नियुक्ती झाली आहे. महासचिव म्हणून या पदावर विराजमान होणा-या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मंत्रींची ओळख करुन दिली, तर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अधिका-यांची ओळख करुन दिली. यावेळी त्यांनी स्नेहलता श्रीवास्तव यांचीही सभागृहाला ओळख करुन दिली.
स्नेहलता श्रीवास्तव या १९८२ च्या बॅचच्या मध्यप्रदेश कॅडरच्या सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी मध्य प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकारमध्ये अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. श्रीवास्तव यांनी विधी आणि न्याय मंत्रालयाच्या सचिव म्हणून तसेच अर्थ मंत्रालयातील विशेष/अतिरिक्त सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यांची लोकसभेच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 1 डिसेंबर रोजी त्यांनी पदभार स्विकारला. लोकसभेचे विद्यमान मुख्य सचिव अनुप मिश्रा हे ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाल्यानंतर स्नेहलता श्रीवास्तव यांनी पदभार स्विकारला.
लोकसभेत महासचिवसारख्या सर्वोच्च पदावर एखाद्या महिलेची नियुक्ती करण्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यसभेत रमा देवी यांनी महासचिव पदाचा कार्यभार स्विकारला होता.
स्नेहलता श्रीवास्तव यांचा कार्यकाळ १ डिसेंबर २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१८ असा असेल. याआधी त्या कायदे मंत्रालयामध्ये सचिव पदावर कार्यरत होत्या. तसेच त्यांनी याआधी अर्थ मंत्रालयात देखील काम केले आहे.