कन्नूर - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या केरळमध्ये भाजपाने सुरु केलेल्या जनरक्षा यात्रेत सहभागी झाले आहेत. तसं पाहिलं तर केरळ आणि उत्तरप्रदेश या दोन्ही राज्यांचं राजकारण, संस्कृती, मुद्दे पूर्णपणे भिन्न आहेत. पण अस असतानाही भाजपा अध्यक्ष अमित शहांनी योगी आदित्यनाथ यांना केरळमध्ये का उतरवले असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
योगी आदित्यनाथ यांच्याकडे हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पाहिले जाते. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असल्यामुळे सध्या त्यांचा सूर मवाळ झाला असला तरी, हिंदुत्ववादी नेत्याची त्यांची इमेज आजही कायम आहे. उत्तरेतील हिंदुत्वाचे हेच राजकारण दक्षिण भारतात खासकरुन केरळमध्ये रुजविण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. आदित्यनाथ यांचा चेहरा त्यासाठी उपयोगी ठरु शकतो. त्यासाठीच जनरक्षा यात्रेमध्ये योगी आदित्यनाथ यांना सहभागी करुन घेतल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितले.
केरळमध्ये डाव्या आघाडीचे सरकार सत्तेवर असताना भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक स्वंयसेवकांच्या हत्या झाल्या आहेत. या हत्यांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. केरळमध्ये राजकीय सूड भावनेतून होणा-या या हत्यांचा निषेध करण्यासाठी भाजपाने जनरक्षा यात्रा सुरु केली आहे. उत्तरप्रदेशात सत्ता मिळवताना कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा सर्वात प्रभावी ठरला होता. केरळमध्येही याच मुद्यावरुन सत्ताधारी डाव्या आघाडीला घेरण्याची भाजपाची रणनिती आहे.