...म्हणून नष्ट झाले मंगळावरील वातावरण; साैर वारे कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 02:35 AM2021-02-22T02:35:06+5:302021-02-22T02:35:18+5:30
शास्त्रज्ञांच्या या दाव्यामुळे जुन्याच सिद्धांताला बळ मिळते.
नवी दिल्ली : साैरमंडळातील लाल ग्रह अर्थात मंगळाबाबत मानवाला कायम कुतूहल राहिले आहे. अलीकडच्या काळात भारत, चीन, अमेरिका, युएई इत्यादी देशांनी या ग्रहावर यान पाठविले आहेत. अमेरिकेच्या ‘पर्सिव्हरन्स राेव्हर’ यानाने तीन दिवसांपूर्वीच मंगळावर सुरक्षित लॅँडिंग केले. आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या माेहिमांमधून काही प्रमाणात माहिती मिळाली आहे. मंगळावरील वातावरण कशामुळे नष्ट झाले, या प्रश्नावर ठाेस उत्तर मिळाले नाही. मात्र, शास्त्रज्ञांनी याचे एक संभाव्य कारण शाेधले आहे. साैर वाऱ्यांमुळे मंगळावरील वातावरण नष्ट झाले असावे आणि त्यासाठी मंगळावर चुंबकीय क्षेत्राचे अस्तित्व नसणे, हे कारण राहण्याची दाट शक्यता वर्तविली आहे.
शास्त्रज्ञांच्या या दाव्यामुळे जुन्याच सिद्धांताला बळ मिळते. जीवन कायम राहण्यासाठी हानिकारक साैर वाऱ्यांना राेखण्यासाठी रक्षात्मक चुंबकीय क्षेत्र आवश्यक असते. हे एक प्रकारचे अदृश्य कवच आहे. पृथ्वीवर भू-विद्युत तंत्र अशा प्रकारचे रक्षात्मक आवरण तयार करते. त्यामुळेच पृथ्वीवरील वातावरणाचे रक्षण हाेते. मंगळावर असे क्षेत्र नाही. परिणामी साैर वाऱ्यांमुळे तेथील वातावरण नष्ट झाले असावे. भारतीय विज्ञान शिक्षा व संशाेधन संस्थेचे शास्त्रज्ञ अर्णब बासक आणि दिब्येन्दू नंदी म्हणाले, चुंबकीय क्षेत्र संरक्षण छत्रीप्रमाणे कार्य करतात.
दुर्लक्षित मुद्दा
विज्ञान पत्रिका ‘मंथली नाेटिसेज ऑफ राॅयल ॲस्ट्राॅनाॅमिकल साेसायटी’मध्ये याबाबत संशाेधन अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. ग्रहांच्या स्वत:च्या अवतीभवती चुंबकीय क्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेकडे आतापर्यंत दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे.
आकर्षण मंगळाचे
भारत-मंगलयान २४ सप्टेंबरपासून मंगळाच्या ऑर्बिटमधून माहिती पाठवीत आहे.
अमेरिका-पर्सिव्हरन्स राेव्हर मंगळावर लँड झाले.
चीन- ‘टियान्वेन-१’ मंगळाच्या ऑर्बिटमध्ये दाखल झाले आहे.
युएई- ‘द हाेप ऑर्बिटर’ मंगळाच्या ऑर्बिटमध्ये दाखल झाले आहे.