... म्हणून जेपी नड्डांनी कल्याणसिंह यांच्या पार्थिवास गुंडाळला भाजपचा झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 05:07 PM2021-08-22T17:07:38+5:302021-08-22T17:10:33+5:30
पंतप्रधान मोदींसह जेपी नड्डा यांनी कल्याणसिंह यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यावेळी, त्यांच्या पार्थिवावर भाजपचा ध्वज गुंडाळून कार्यकर्त्यांतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहिली.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह (Kalyan Singh) यांचं शनिवारी रात्री निधन झालं. त्यांनी लखनौमधील एसजीपीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड महिन्यांपासून ते आजारी होते. कल्याण सिंह यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. तर, जेपी नड्डा यांनी कल्याणसिंह यांच्या पार्थिवावर भाजपचा ध्वज टाकून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पंतप्रधान मोदींसह जेपी नड्डा यांनी कल्याणसिंह यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यावेळी, त्यांच्या पार्थिवावर भाजपचा ध्वज गुंडाळून कार्यकर्त्यांतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहिली. कल्याणसिंह यांची अखेरची इच्छा असल्याने त्यांच्या पार्थिवाला हा ध्वज गुंडाळण्यात आला होता. यावेळी, पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
कल्याण सिंह यांनी दुसऱ्यांदा भाजपात प्रवेश केल्यानंतर आयोजित एका सभेत बोलताना आपली शेवटची इच्छा बोलून दाखवली होती. माझ्या रक्तात संघ आणि भाजपचे संस्कार आहेत. मी आयुष्यभर भाजपात राहावं आणि मृत्यूनंतर माझ्या पार्थिवाला भाजपच्या ध्वजात गुंडाळूनच स्मशानभूमित नेण्यात यावं, असे कल्याणसिंह यांनी म्हटलं होतं. त्यांनी आपली शेवटची इच्छा यावेळी बोलून दाखवली होती. त्यामुळेच, नड्डा यांनी त्यांच्या पार्थिवावर भाजपचा ध्वज गुंडाळल्याचे दिसून आले.
मोदींनी वाहिली श्रद्धांजली
"मी माझं दु:ख शब्दात व्यक्त करू शकत नाही. कल्याण सिंह हे राजकारणी, अनुभवी प्रशासक आणि महान व्यक्ती होते. उत्तर प्रदेशच्या विकासात त्यांचं मोलाचं योगदान आहे. मी त्यांचे सुपुत्र राजवीर सिंह यांच्याशीही संवाद साधला आणि शोक व्यक्त केला," असं ट्वीट पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
विचारधारेपुढे सत्ता किती गौण - नितीन गडकरी
आदरणीय कल्याण सिंहजी यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. उत्तर प्रदेशात जनसंघ आणि भाजप उभा करण्यात कल्याण सिंहजी यांचे सर्वात महत्वाचे योगदान आहे. विचारधारेपुढे सत्ता किती गौण आहे, ही शिकवण कल्याण सिंहजी यांनी आम्हाला दिली. समर्पित राम भक्त, मातीशी नाळ असणारे खरे लोकनेते कल्याण सिंहजी यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
अमित शाहंनीही वाहिली श्रद्धांजली
कल्याण सिंह यांच्या निधनामुळे देशानं एक खरा राष्ट्रभक्त, प्रामाणिक आणि धर्मनिष्ठ राजकारणी गमावला आहे. बाबूजी हे एक असे विराट वटवृक्ष होते, ज्यांच्या भाजपचं संघटन अधिक वाढलं. राष्ट्रवादाचे खरे उपासक म्हणून त्यांनी जीवनभर देशाची आणि जनतेची सेवा केली असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कल्याण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली.
अलीगढमध्ये झाला होता जन्म
५ जानेवारी १९३२ रोजी उत्तर प्रदेशातील अलीगढमधी अतरौली तहसीलातील मढौली गावात कल्याण सिंह यांचा जन्म झाला होता. कल्याण सिंह यांची ओळख एक हिंदुत्ववादी नेते आणि प्रखर वक्ते अशी होती. राम मंदिर आंदोलनातही सर्वात मोठ्या चेहऱ्यापैकी ते एक होते.
युपीत भाजपचे पहिले मुख्यमंत्री
कल्याण सिंह यांनी दोन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. ते उत्तर प्रदेशातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते. २४ जून १९९१ ते ६ डिसेंबर १९९२ असा त्यांचा पहिला कार्यकाळ होता आणि २१ सप्टेंबर १९९७ पासून १२ नोव्हेंबर १९९९ असा त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दुसरा कार्यकाळ होता. ते १९६७ मध्ये पहिल्यांदा अतरौली येथून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते १० वेळा आमदार म्हणून निवडून गेले. ४ सप्टेंबर २०१४ ते ८ सप्टेंबर २०१९ या दरम्यान ते राजस्थानचे राज्यपालही होते.