अहमदाबाद - यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीवर जातीय समीकरणांचा मोठा प्रभाव आहे. मागच्या तीन विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात धार्मिक मुद्यांवर भर देण्यात आला होता. पण मागच्या दोनवर्षात उभ्या राहिलेल्या पटेल आरक्षण आंदोलनामुळे यंदा सर्वच समीकरणेच बदलून गेली आहेत. पहिल्या टप्प्यात कच्छ-सौराष्ट्रमध्ये मतदान पार पडले आता दुस-या टप्प्यात भाजपा आणि काँग्रेस दोघांनी मध्य गुजरावर लक्ष केंद्रीत केले आहे.
मध्य गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 38 जागा आहेत. मध्य गुजरातमध्ये आनंद, खेडा, वडोदरा, पंचमहाल, दाहोद हे जिल्हे आहेत. 2012 मध्ये भाजपाने मध्य गुजरातमध्ये 38 पैकी 20 जागा जिंकल्या होत्या. यावेळी मध्य गुजरातमध्ये आरक्षणाच्या मुद्यारुन पटेल समाज भाजपावर काही प्रमाणात नाराज आहे. ओबीसी सुद्धा भाजपाला साथ देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपाने यंदा मध्य गुजरातमधील आदिवासी मतांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
आदिवासी मतदारांना खेचून आणण्यासाठी भाजपाने रणनिती आखून त्यानुसार काम केले आहे. खरतर इथला आदिवासी समाज काँग्रेसचा पारंपारिक मतदार आहे. पण हेच आदिवासी भाजपाच्याही विरोधात नाहीत. त्यामुळे पटेल मते कमी झाल्यास जी तूट निर्माण होईल ती भरून काढण्यासाठी भाजपाने आदिवासी मतांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मागच्या वर्षी भाजपाने ज्या 20 जागा जिंकल्या होत्या. त्यातील 10 जागा एकटया वडोदरा जिल्ह्यातील होत्या. वडोदरा भाजपाचा बालेकिल्ला आहे. मध्य गुजरातमध्ये म्हणावा तसा औद्योगिक विकास झालेला नाही. त्यामुळे औद्योगिक विकास, शेतक-यांचे प्रश्न इथेही आहेत. मागच्या 22 वर्षांपासून राज्यात सत्ता असल्याने भाजपाला प्रस्थापित सरकारविरोधी लाटेचाही सामना करावा लागत आहे.
नरेंद्र मोदी स्वत:च्या हिम्मतीवर गुजरात जिंका गुजरात विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर या मुद्यावरुन राजकारण तापू लागले आहे. पाकिस्तानने हा आरोप फेटाळून लावताना गुजरात निवडणुकीशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
भारताने आपल्या राजकीय लढाईत पाकिस्तानला खेचू नये. अशी कटकारस्थान करण्याऐवजी स्वत:च्या हिम्मतीवर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करावा. आम्ही गुजरात निवडणुकीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आणि निराधार आहे असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मह फैसल यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.