रेल्वेच्या मोकळ्या जागांवर सौर वीज प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 04:05 AM2018-12-06T04:05:48+5:302018-12-06T04:06:00+5:30
आपल्या मालकीच्या रिकाम्या जागांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
नवी दिल्ली : आपल्या मालकीच्या रिकाम्या जागांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. खर्च कमी करण्यासाठी हा उपाय असून, रेल्वेच्या खुल्या जागांवरील प्रकल्पांतून सुमारे ३0 गिगावॅट वीजनिर्मिती होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
सध्या रेल्वेचे उत्पन्न आणि खर्चाचे प्रमाण व्यस्त आहे. प्रत्येक १00 रुपयांच्या उत्पन्नामागे रेल्वेचा खर्च १११ रुपये आहे. खुल्या जागांवरील वीजनिर्मितीमुळे रेल्वेचे वीजबिलापोटी दरवर्षी खर्च होणारे ३0 हजार कोटी रुपये वाचतील.
रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विनावापर पडून असलेल्या जागांवर प्रकल्प उभारल्यास, त्यातून ३0 गिगावॅट सौरवीज निर्माण होऊ शकेल. पहिल्या टप्प्यात १0 गिगावॅट वीजनिर्मिती करण्याचे रेल्वेचे लक्ष्य आहे. त्यासाठीची औपचारिक प्रक्रिया सुरू आहे. रेल्वेने निश्चित केलेली नवी उद्दिष्टे आधीच्या उद्दिष्टांपेक्षा जास्त आहेत. आधीच्या योजनेत २0२0 पर्यंत १ हजार मेगावॅट म्हणजेच १ गिगावॅट सौरवीजनिर्मिती करण्याचे प्रस्तावित होते.