राजौरीमध्ये पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, गोळीबारात एक जवान शहीद, तीन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 12:15 PM2019-03-18T12:15:13+5:302019-03-18T12:21:42+5:30
पाकिस्तानच्या सैन्यानं पहाटे साडेपाच वाजता जम्मू-काश्मीरमधल्या राजौरीमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.
श्रीनगर- पाकिस्तानच्या सैन्यानं पहाटे साडेपाच वाजता जम्मू-काश्मीरमधल्या राजौरीमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानच्या सैनिकांकडून नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार सुरू असून, उखळी तोफांचा मारा करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून राजौरीतल्या सुंदरबनी सेक्टरमध्ये होत असलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला असून, तीन जवान जखमी आहेत.
भारतीय लष्करही पाकिस्तानच्या या आगळिकीला चोख प्रत्युत्तर देत आहे. पुलवामा दहशतवादी हल्ला आणि भारताकडून जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणांना एअर स्ट्राइकच्या माध्यमातून लक्ष करण्यात आल्यानंतर नियंत्रण रेषेवर तणाव आहे. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. तत्पूर्वी भारतीय लष्करानं पाककडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर मेंढर सेक्टरजवळील बलनोईमधील पाकिस्तानची चौकी उडवून दिली होती. या कारवाईत पाकिस्तानचे काही सैनिकही जखमी झाले आहेत.