पुलवामामध्ये चकमकीत एक लष्करी जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 03:27 AM2020-08-13T03:27:17+5:302020-08-13T03:27:27+5:30
दहशतवाद्याचा केला खात्मा; एका जखमी जवानावर उपचार सुरू
पुलवामा : काश्मीर खोऱ्यातील पुलवामा जिल्ह्यातील कामराझीपोरा भागामध्ये बुधवारी पहाटे दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला, तर एका दहशतवाद्याचा जवानांनी खात्मा केला. या चकमकीत आणखी एक जवान जखमी झाला आहे.
ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटू शकलेली नाही. शहीद झालेल्या जवानाबद्दल अद्याप पूर्ण माहिती हाती आलेली नाही. कामराझीपोरा भागामध्ये दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळताच लष्करी जवानांनी तिथे शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. लष्करी जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला आहे.
दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेले असता त्यातील एका जवानाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुसºया जखमी जवानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक एके रायफल व काही ग्रेनेड जप्त करण्यात आली. काश्मीरमध्ये मंगळवारी सुरक्षा दलाने कुपवाडा येथे नियंत्रण रेषेजवळील भागात हिज्बुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यासह पाच जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.
बंदोबस्तात वाढ
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये घातपाती कारवाया घडू नयेत यासाठी तेथील बंदोबस्त आणखी कडक करण्यात आला आहे. जम्मू तसेच काश्मीर खोºयात महत्त्वाच्या ठिकाणी वाहनांची अधिक बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. जम्मूतील मिनी स्टेडियम येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.
कोरोना साथीमुळे यंदा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम खूप कमी लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जम्मू-पठाणकोट, जम्मू-श्रीनगरदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची कसून तपासणी सुरू आहे. ट्रकमधून दहशतवादी तसेच शस्त्रसाठ्याची वाहतूक केली जाते, असे निदर्शनास आल्याने हे पाऊ ल उचलण्यात आले आहे.