नवी दिल्ली- सॉलिसीटर जनरल रणजित कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रणजित कुमार यांनी वैयक्तिक कारणांमुळे शुक्रवारी कायदे मंत्रालयात राजीनामा पाठविला. सॉलिसीटर जनरल हे देशातील दुसरं सर्वात वरिष्ठ कायदा अधिकारी पद आहे. अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांच्या राजीनाम्यानंतर एका महिन्यातच रणजित कुमार यांनी राजीनामा दिला आहे.
कुटुंबातील काही सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही, असं कारण रणजित कुमार यांनी दिलं आहे. रणजित कुमार यांना त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही. सॉलिसीटर जनरल पदावर काम करण्याचा अनुभव उत्तम आहे तसंच सरकारच्या व्यवहारामुळे पूर्णपणे संतुष्ट असल्याचं रणजित कुमार यांनी सांगितलं आहे.
रणजित कुमार यांना मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर जून 2014मध्ये सॉलिसीटर जनरल पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर तत्कालीन सॉलिसीटर जनरल मोहन परासरन यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्यानंतर रंजीतकुमार पदावर नियुक्त झाले.
घटनात्मक कायदे, नागरी सेवा, करसंबंधीच्या कायद्यांविषयीचे जाणकार म्हणून त्यांना ओळखले जातं. यापूर्वी कुमार यांनी गुजरात सरकारसाठी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं होतं. सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणात त्यांनी गुजरात सरकारची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली होती.