छत्तीसगड, दि.1- गावात असलेल्या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेल्या पुढाकाराची अनेक उदाहरणं आपण पाहतो. गावात पाण्याची चणचण जाणवू नये यासाठी विविध उपक्रमही राबविले जातात. असंच एक उदाहरण छत्तीसगडमध्ये पाहायला मिळतं आहे. छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातील एका व्यक्तीने गावातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जमीन खोदून तेथे तलाव बनवला. सजा पहाड गावातील श्याम लाल हे 15 वर्षांचे असताना त्यांनी जमीन खोदून तलाव तयार करण्याचं आव्हान त्यांच्या खांद्यावर घेतलं. गावातील लोकांच्या मते श्याम लाल यांना जमीन खोदून तलाव तयार करायला एकुण 27 वर्ष लागली.
छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातील त्या गावात काही वर्षांपूर्वी पाण्याची खूप चणचण होती. गावातील लोकांसमोर त्यांच्याकडे असलेल्या गायींची तहान भागविण्याचा प्रश्न होता. त्यावेळी सरकारकडूनही त्यांना काही मदत मिळाली नव्हती. तेव्हा 15 वर्षीय श्याम लाल पुढे आले. त्यांनी गावातील एक जागा निवडली आणि तेथे खोदकाम सुरू केलं. ज्यावेळी श्याम लाल यांनी काम सुरू केलं तेव्हा सुरूवातीला गावातील लोक त्यांना हसायचे. पण तरिही श्याम लाल यांनी न थांबता काम सुरूच ठेवलं. श्याम लाल यांनी केलेलं काम हे बिहारच्या दशरथ मांझी यांच्यासारखं असल्याची चर्चा आता त्या गावात सुरू झाली आहे. बिहारचे माऊंटन मॅन दशरथ मांझी यांनी 22 वर्ष डोंगरालामधून कापून तेथून रस्ता बनवला होता.
आता श्याम लाल हे 42 वर्षांचे आहेत. गावात तलाव खोदायचं काम मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मला कोणीही मदत केली नाही. सरकार आणि ग्रामस्थ कुणीही मदतीसाठी नव्हतं. पण गावातील लोकांच्या आणि प्राण्यांच्या भल्याचा विचार माझ्या डोक्यात होता. म्हणून मी काम सुरूच ठेवलं, असं श्याम लाल यांनी सांगितलं.
श्याम लाल यांनी गावासाठी केलेल्या या कामामुळे ग्रामस्थ त्यांना आदर्श मानतात. श्याम यांनी खोदलेल्या तलावातील पाण्या गावातील प्रत्येक व्यक्ती उपयोग करतो. श्याम लाल यांनी केलेल्या या कामाचा सगळीकडूनच गौरव केला जातो आहे. महेंद्रगडचे आमदार श्याम बिहारी जायसवाल यांनी श्याम यांचा दहा हजार रूपये देऊन गौरव केलाय