शिर्डीचा 'तो' प्रश्न प्राधान्यानं सोडवा, सुजय विखेंनी संसदेत मांडले 3 प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 04:06 PM2019-07-17T16:06:14+5:302019-07-17T16:08:42+5:30
देशातील सुरू असलेल्या रस्ते विकास कामांबद्दल सुजय यांनी नितीन गडकरींचे आभार मानले.
नवी दिल्ली - अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी लोकसभेत शिर्डी मतदारसंघाचा प्रश्न उपस्थित केला. अर्थसंकल्पातील भाषणावर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे आभार व्यक्त करताना, सुजय यांनी आपल्या मतदारसंघातील प्रश्नही मांडले. त्यामध्ये, शिर्डी हे धार्मिक तिर्थक्षेत्र असून भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे, शिर्डीसाठी पुणे ते शिर्डी या 8 पदरी महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करावे, अशी मागणीही त्यांनी दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
देशातील सुरू असलेल्या रस्ते विकास कामांबद्दल सुजय यांनी नितीन गडकरींचे आभार मानले. तसेच, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 जो कल्याण ते आंध्र प्रदेशच्या सीमारेषेवर जातो. या महामार्गासाठी जमिन हस्तांतरण प्रक्रिया जलद करावी. या महामार्गावर एक फ्लायओव्हरही आहे, या फ्लायओव्हरमुळे त्याठिकाणी ट्रॅफिक कमी होईल. त्यासाठी जमीन आवंटन प्रक्रिया लवकरात लवकरच करावी, अशी माझी विनंती असल्याचे सुजय यांनी म्हटले. तसेच, त्याच राष्ट्रीय महामार्गावरील बायपासचे (बाह्यवळण रस्ता) कामही हळूवार गतीने सुरू आहे. जमीन हस्तांतरण प्रक्रिया वेगवान नसल्याने हे काम संथ गतीने सुरू असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
शिर्डी मतदारसंघातील प्रश्नाबाबत बोलताना, अध्यक्ष महोदय आपण शनिवारी किंवा रविवारी शिर्डीला येऊन पाहा. शिर्डीत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. शिर्डी हे देशातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यात, पुण्याहून शिर्डीकडे येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पुणे ते शिर्डी हा 8 पदरी महामार्ग करावा, अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी केली. त्याचप्रमाणे भारतमाला 2 योजनते पुणे ते औरंगाबाद या 8 पदरी महामार्गाचे कामही प्राधान्याने घ्यावे, अशीही मागणी सुजय यांनी ससंदेतील भाषणावेळी केली. आपल्या संसदीय कारकिर्दीतील सुजय विखेंचं हे पहिलचं भाषण होतं, ज्यामध्ये त्यांनी मतदारसंघातील प्रश्नांकडे लक्ष वेधले.