नवी दिल्ली: देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवण्यात आल्या आहेत. इंटरनेटबद्दल नेहरुंबद्दल अतिशय आक्षेपार्ह मजकूर पद्धतशीरपणे उपलब्ध आहेत. देशाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देणाऱ्या नेहरुंबद्दलच्या अनेक अफवा पसरवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आजही राजकीय लाभासाठी नेहरुंच्या नावाचा वापर केला जातो. नेहरुंबद्दलच्या अफवा-- नेहरुंच्या आजोबांचं नाव गियासुद्दीन गाजी होतं. ते मुघलांची चाकरी करायचे. त्यांनी नंतर स्वत:चं नाव बदलून गंगाधर नेहरु केलं. - नेहरुंचा जन्म अलाहाबादच्या एका वेश्यालयात झाला. - नेहरुंमुळे एक नन गर्भवती राहिली. चर्चनं त्या ननला भारताबाहेर पाठवलं. त्यामुळे नेहरु कायम त्या चर्चचे ऋणी राहिले. त्यांचा मृत्यू सिफिलिस नावाच्या रोगामुळे झाला. - अमिताभ बच्चन नेहरुंचे सुपुत्र आहेत.
आणखीही अनेक अफवाजवाहरलाल नेहरुंबद्दल इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह माहिती उपलब्ध आहे. ही माहिती तथ्यहीन आहे. स्वतंत्र भारताचा पाया रचण्यात, विविध संस्थांची पायाभरणी करण्यात नेहरुंचं योगदान किती आहे, याबद्दल फारसं भाष्य करण्याची आवश्यकता नाही. नेहरुंनी उभारलेल्या अनेक संस्था आजही टिकून आहेत आणि त्यांनी देशाच्या विकासात सिंहाचा वाटा उचलला आहे. 'इतिहासात कधीही न वाचलेल्या गोष्टी वाचायला मिळाल्यावर लोकांच्या त्यावर उड्या पडतात. अनेकदा लोक त्याची खातरजमा करत नाहीत,' असं विश्लेषण डिजिटल मीडियाचे जाणकार निशांत शाह यांनी केलं.
नेहरुंनी केली होती गांधींची हत्यामहात्मा गांधींची हत्या नेहरुंनी घडवली होती, असा दावा संघाचे माजी सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांनी केला होता. मात्र यात तथ्य नाही. नेहरुंबद्दलची माहिती इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात पसरवली जात असल्याचं निरीक्षण सेंट क्लारा विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या रोहित चोप्रा यांनी नोंदवलं. ऑनलाईन उपलब्ध असलेल्या माहितीमुळे मोठ्या समस्या निर्माण होतात. अनेकदा प्रतिमा मलीन करण्यासाठी खोटी माहिती पद्धतशीरपणे पसरवली जाते आणि लोकांना ती माहिती खरी वाटते, असं चोप्रा यांनी सांगितलं.
कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या कायम निशाण्यावरकट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी नेहरुंना मान्य नव्हती. देशाच्या फाळणीनंतर आणि विशेषत: गांधींच्या हत्येनंतर नेहरु कट्टर हिंदुत्वाच्या मुद्यावर अधिक सतर्क झाले, असं प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सांगितलं. कट्टर हिंदुत्व मानणाऱ्या संघाकडे नेहरुंनी कायम धोका म्हणून पाहिलं. त्यांनी जाहीरपणे संघावर टीका केली होती. त्यामुळेच नेहरु कायम संघाच्या रडारवर राहिले.
'नेहरु अय्याशी करायचे'नेहरुंची प्रतिमा मलीन करणारे अनेक व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत. भारतातील सर्वात अय्याश व्यक्ती असं नेहरुंचं वर्णन या व्हिडीओंमधून करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे लाखो लोकांनी हे व्हिडीओ पाहिले आहेत. काही व्हिडीओंमध्ये नेहरुंना मुस्लिम ठरवण्यात आलं आहे. तर काही व्हिडीओंमध्ये नेहरुंचं राहणीमान पाश्चिमात्यांप्रमाणे होतं, असा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष केनडी यांच्या पत्नी आणि मृणालिनी साराभाई यांच्यासोबतचे नेहरुंचे फोटो चुकीच्या पद्धतीनं पसरवण्यात आले आहेत.
नेहरुंना बदनाम करण्याचे अनेक प्रयत्नगेल्या वर्षी मोतीलाल नेहरु आणि जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दलची विकीपिडियावरील माहिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे भारत सरकारच्या आयपी अॅड्रेसवरुन ही माहिती बदलण्याचा प्रयत्न झाला. ही माहिती आक्षेपार्ह होती. नेहरुंनी लिहिलेलं पत्रदेखील काही महिन्यांपूर्वी व्हायरल करण्यात आलं होतं. यामध्ये नेहरुंनी सुभाषचंद्र बोस यांना अपराधी म्हटल्याचा उल्लेख होता. मात्र ते पत्र बोगस होतं.