'NDAच्या काही नेत्यांना मोदी पंतप्रधानपदी नकोत'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 05:10 PM2018-08-31T17:10:17+5:302018-08-31T17:22:57+5:30
गेल्या काही दिवसांपासून एनडीएच्या घटक पक्षांनी मोदी आणि अमित शाहांच्या एकंदरीत कार्यपद्धतीबद्दल जाहीररीत्या नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून एनडीएच्या घटक पक्षांनी मोदी आणि अमित शाहांच्या एकंदरीत कार्यपद्धतीबद्दल जाहीररीत्या नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना, टीडीपी, अकाली दल या पक्षांनी जाहीररीत्या टीका केली आहे. तसेच चंद्राबाबूंचा टीडीपीही मोदी सरकारमधून बाहेर पडला. आता बिहारमधल्या राष्ट्रीय लोक समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी मोदींबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. एनडीएच्या काही लोकांना नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी नको आहेत.
यासंदर्भात विस्तारानं सांगितल्यास घरातली गोष्ट बाहेर जाण्यासारखं होईल. वेळ आल्यावर अशा लोकांचा मी खुलासा करेन, असंही कुशवाह म्हणाले आहेत. जागावाटपाबाबत ते म्हणाले, जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. भाजपा आणि रामविलास पासवान यांनीही यावर खुलासा केला आहे. त्यामुळे जागावाटपासंदर्भात होणा-या चर्चा या चुकीच्या आहेत.
एनडीएमधीलच काही जण अशा प्रकारच्या बातम्या पेरतायत. त्यांना वाटतं की, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनू नयेत, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, यासाठी ते काहीना काही उचापत्या करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या बैठक झाल्यानंतर मी चर्चा करणार आहे. आरक्षणानं कोणाचंही नुकसान होत नाही. दक्षिणेकडच्या राज्यांत सर्वाधिक आरक्षण आहे. ती राज्ये सर्वाधिक विकसित आहेत. आरक्षणासंदर्भात लोकांमध्ये चुकीचा समज पसरवला जातोय. बिहारच्या लोकांमधील गैरसमज दूर करण्याची गरज आहे, असंही कुशवाह म्हणाले आहेत.
तत्पूर्वी एनडीएचा घटक पक्ष आणि मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या राष्ट्रीय लोक समता पार्टी(आरएलएसपी)चे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरजेडीच्या नेतृत्वातील महागठबंधनमध्ये सहभागी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. कुशवाह यांनी भर सभेत तशा प्रकारचे संकेत दिले होते. पाटण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात कुशवाह म्हणाले होते की, स्वादिष्ट खीर ही यादवांचं दूध आणि कुशवाह लोकांनी पिकवलेल्या भातानंच होऊ शकते.
यादवांकडे प्रामुख्यानं दूध उत्पादक म्हणून पाहिलं जातं. बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांचा पक्ष आरजेडींकडे यादवांचं प्राबल्य आहे. उपेंद्र कुशवाह हे स्वतः कुशवाह समाजातून आलेले आहेत. कुशवाह समाजाचं प्रमुख उदरनिर्वाहाचं साधन हे भात पिकवणं आहे. त्यामुळे कुशवाह यांनी केलेल्या खिरीचा संदर्भ लालूप्रसाद यांचा पक्ष आरजेडीकडे असल्याचाही काहींचा कयास आहे. येत्या काही दिवसांत कुशवाह महागठबंधनचाही भाग होण्याचा अंदाज वर्तवला जाऊ लागला आहे.