नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्यावेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्याचा माझा निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना पटला नव्हता. त्या माझ्यावर नाराज झाल्या होत्या. त्यांनी मला बाळासाहेबांची भेट न घेण्याचा सल्ला दिला होता. तरीही मी बाळासाहेबांना भेटलो होतो. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून हा खुलासा केला आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी प्रणव मुखर्जी महाराष्ट्र दौ-यावर असताना त्यांनी मुंबईत मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांची भेट घेतली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाप्रणीत एनडीएमध्ये असूनही प्रणव मुखर्जींनी पाठिंबा जाहीर केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्यावरुन ही भेट झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यावेळी काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये सहभागी होता.
'द कोएलिशन इयर्स :1996-2012'' या आत्मचरित्रात प्रणव मुखर्जी यांनी बाळासाहेब ठाकरेंबरोबर झालेल्या भेटीविषयी सविस्तर भाष्य केले आहे. 13 जुलै 2012 रोजी प्रणव मुखर्जी मुंबईत आले होते. भाजपासोबत असूनही शिवसेनेने न मागता पाठिंबा दिला होता. त्यांचा पाठिंबा पूर्णपणे अनपेक्षित होता असे मुखर्जी यांनी म्हटले आहे. मुंबई दौ-यात मी बाळासाहेबांची भेट घ्यावी का? याविषयी मी सोनिया गांधी आणि शरद पवार दोघांना विचारले होते.
मातोश्रीवर चर्चेला येण्यासाठी मला बाळासाहेंबाकडून अनेक संदेश मिळाले होते. माझ्या आणि बाळासाहेबांच्या भेटीविषयी सोनिया गांधी फारशा उत्सुक्त नव्हत्या. शक्य असल्यास मी बाळासाहेबांची भेट टाळावी असे त्यांचे मत होते. सोनिया गांधींचा जो राजकीय दृष्टीकोन आहे त्या आधारावर मी बाळासाहेबांना भेटू नये असे त्यांना वाटत होते असे प्रणव मुखर्जींनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहीले आहे. शरद पवारांचा सल्ला बिलकुल याउलट होता. मी बाळासाहेबांना भेटावे असे शरद पवारांचे मत होते. माझ्या मातोश्री भेटीच्यावेळी तिथे खास व्यवस्था करण्यात आली होती असे मुखर्जी यांनी पुस्तकात लिहिले आहे.
मुंबई दौ-यात मी बाळासाहेबांना भेटलो नाही तर बाळासाहेब व्यक्तीगत अपमान केल्याचा अर्थ काढू शकतात असा पवारांनी मला सांगितले होते. आपल्या पारंपारिक मित्राची साथ सोडून ज्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला त्यांचा अपमान करण्याची माझी इच्छा नव्हती त्यामुळे मी सोनिया गांधींची इच्छा नसतानाही मातोश्रीवर बाळासाहेबांच्या भेटीसाठी गेलो असे मुखर्जींनी लिहीले आहे. मीच शरद पवारांना विमानतळावरुन मला मातोश्रीवर नेण्याची विनंती केली होती आणि ते ही लगेच तयार झाले असे पुस्तकात म्हटले आहे.