विरोधकांच्या एकीसाठी सोनिया गांधींचे प्रयत्न; अधीररंजन यांची ममतांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 07:49 AM2021-11-24T07:49:37+5:302021-11-24T07:50:07+5:30
अधीररंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, देशाला काँग्रेसमुक्त करण्याच्या मोदी यांच्या मोहिमेत ममता या सहभागी आहेत. काँग्रेसविरुद्धच्या मोहिमेत त्यांनी मोदी यांच्याशी हातमिळवणी केली आहे.
शीलेश शर्मा -
नवी दिल्ली : विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी सातत्याने तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांच्या संपर्कात आहेत. मात्र, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांचा ममता बॅनर्जींशी छत्तीसचा आकडा असून, ममता यांच्यावर टीका करण्याची ते एकही संधी सोडत नाहीत.
अधीररंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, देशाला काँग्रेसमुक्त करण्याच्या मोदी यांच्या मोहिमेत ममता या सहभागी आहेत. काँग्रेसविरुद्धच्या मोहिमेत त्यांनी मोदी यांच्याशी हातमिळवणी केली आहे. अभिषेक यांना ईडीपासून वाचविण्यासाठी ममता बॅनर्जी या काँग्रेस नेत्यांना राज्यसभेचे प्रलोभन देऊन तृणमूलमध्ये सहभागी करत आहेत. अलिकडेच सुष्मिता देव, फेलेरियो, अभिजीत मुखर्जी यांसारख्या नेत्यांना त्यांनी काँग्रेसपासून तोडत तृणमूलमध्ये सहभागी करुन घेतले आहे. गोवा, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यात तृणमूलचा जनाधार नाही.
या राज्यात निवडणूक लढविण्याच्या घोषणेतून हे स्पष्ट आहे की, त्या काँग्रेसच्या वोट बँकेत फूट पाडत आहेत, जेणेकरुन भाजपला निवडणुकीत फायदा मिळू शकेल.