नवी दिल्ली - सोनिया गांधी यांनी संसद भवन परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र सोनिया गांधी या केवळ काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहेत. त्यांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारलेली नाही, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी सोनिया गांधी संसदेत आल्या होत्या त्यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना आपण आता निवृत्त होणार असल्याचे म्हटले होते. तेव्हापासून सोनिया गांधी यांनी राजकीय जीवनातून निवृत्त होत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकू लागले होते. मात्र काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत सोनिया गांधीच्या राजकीय निवृत्तीचे वृत्त तातडीने फेटाळून लावले. "सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती स्वीकारली आहे, राजकारणातून नाही. त्यांचे आशीर्वाद, अनुभव आणि वचनबद्धता काँग्रेससाठी नेहमीच मार्गदर्शक ठरतील." असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे. संसदेच्या हिवाळी अधिकवेशनासाठी सोनिया गांधी संसदेत उपस्थित राहिल्या होत्या त्यावेळी संसद भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदावरून निवृत्तीबाबत भाष्य केले होते. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये सोनिया गांधींच्या राजकीय निवृत्तीचे वृत्त प्रसारित झाले होते. सर्वाधिक काळ काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा पुत्र राहुल गांधी यांच्या हाती सोपवण्याच निर्णय नुकताच घेतला होता. यापूर्वी या घरातील मोतिलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. आता सोनिया गांधी यांच्यानंतर अध्यक्ष होणार ते घरातील सहावे अध्यक्ष असतील.
सोनिया गांधींची निवृत्ती राजकारणातून नाही, केवळ अध्यक्षपदावरून - काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 4:28 PM