लवकरच सामान्यांच्या सेवेत येणार 'मोदी केअर योजना', 50 कोटी लोकांना होणार लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 08:43 PM2018-02-02T20:43:36+5:302018-02-02T20:53:20+5:30
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी बजेटमध्ये अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. शेतकरी आणि सामान्यांच्या फायद्यासाठी ब-याच तरतुदी बजेटमध्ये मांडण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी बजेटमध्ये अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. शेतकरी आणि सामान्यांच्या फायद्यासाठी ब-याच तरतुदी बजेटमध्ये मांडण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अरुण जेटली यांनी 'मोदी केअर योजना'ही जाहीर केली आहे. जगामधील ही सर्वात मोठी आरोग्य योजना असून, कॅशलेस स्वरुपात ती उपलब्ध होणार असल्याचे सूतोवाचही जेटलींनी केले आहेत.
या योजनेंतर्गत बहुतेक खासगी आणि शासकीय रुग्णालयांत रुग्णांना उपचारासाठीच्या खर्चाचा विमा उपलब्ध होणार आहे. या योजनेत सरकारी रुग्णालये आणि काही मोजक्या खासगी रुग्णालयांनाही समाविष्ट करण्यात आलं आहे. यावर सखोल विश्लेषण सुरू असून, त्यासाठी नीती आयोग आणि आरोग्य मंत्रालयामध्ये अनेक चर्चेच्या फे-याही झडल्या आहेत. मोदी केअर योजना येत्या 2018-19 या आर्थिक वर्षात लागू होणार असल्याचेही सांगितले जाते.
आठ महिन्यांनंतर ही योजना प्रत्यक्षात सामान्यांच्या सेवेत येणार असून, या योजनेचं लोकार्पण गांधी जयंतीच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या 2 ऑक्टोबरपासून या योजनेला सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय स्वास्थ्य संरक्षण योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या या मोदी केअर योजनेसाठी गरज पडल्यास निधीची मर्यादाही वाढवण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत देशभरातील 40 टक्के लोकसंख्येला म्हणजेच 10 कोटी कुटुंबांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज पडल्यास 5 लाखांपर्यंतच्या उपचारांसाठी विमा सुरक्षा देण्यात येणार आहे.