फोगट कुटुंबीयांना दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींचे आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 04:38 PM2018-07-09T16:38:04+5:302018-07-09T16:39:58+5:30
दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे-इन चार दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत. राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यानंतर मून-जे-इन यांचा भारतातील पहिलाच दौरा आहे. या दौ-यात त्यांच्यासोबत त्यांची पत्नी किम जोंग सुक आहेत.
नवी दिल्ली : दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे-इन चार दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत. राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्यानंतर मून-जे-इन यांचा भारतातील पहिलाच दौरा आहे. या दौ-यात त्यांच्यासोबत त्यांची पत्नी किम जोंग सुक आहेत.
भारतात आल्यानंतर मून-जे-इन यांची पत्नी किम जोंग सुक यांनी ऑलिम्पिक पदक विजेत्या गीता आणि बबीता फोगट यांच्यावर आधारित अभिनेता आमिर खानचा 'दंगल' चित्रपट पाहिला. यानंतर त्यांनी फोगट कुटुंबीयांना भेटीचे आमंत्रण दिले आहे. मून-जे-इन आणि किम जोंग सुक दिल्लीतील ओबरॉय हॉटेलमध्ये फोगट कुटुंबीयांची उद्या (दि.10) भेट घेणार आहेत. दुपारी अडीच वाजताची वेळ त्यांना देण्यात आली आहे.
आम्हाला किम जोंग सुक यांनी चहाचे आमंत्रण दिले आहे. आमच्यासाठी फार अभिमानाची बाब आहे. तसेच दबंग चित्रपट दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्याचे माध्यम बनल्याचा मला आनंद आहे, असे महावीर फोगट यांनी सांगितले. तर राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नीसोबत चर्चा करु त्यावेळी आम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. कोरिया आणि भारत यांच्यातील संबंध सुद्धा जाणून घ्यायला आवडेल, असे महावीर फोगाट यांची लहान मुलगी संगीता बलालीने सांगितले.