संविधान चर्चेत ठिणग्या
By admin | Published: November 27, 2015 03:31 AM2015-11-27T03:31:02+5:302015-11-27T03:31:02+5:30
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारतीय संविधानाप्रति प्रतिबद्धता व्यक्त करण्यासाठी झालेल्या विशेष चर्चेलाही राजकीय रंग चढले आणि सत्ताधारी व विरोधकांच्या मनात जोरदार ठिणग्या उडाल्या.
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारतीय संविधानाप्रति प्रतिबद्धता व्यक्त करण्यासाठी झालेल्या विशेष चर्चेलाही राजकीय रंग चढले आणि सत्ताधारी व विरोधकांच्या मनात खदखदणाऱ्या असंतोषाच्या जोरदार ठिणग्या उडाल्या. भाजपा-काँग्रेसदरम्यान शाब्दिक चकमकी, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. चर्चेला सुरुवात करताना गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केलेल्या भाषणाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अतिशय संयत स्वरात मुद्देसूद पण सडेतोड उत्तर दिले.
‘राज्यघटनेच्या निर्मितीत ज्यांचे योगदान नाही, घटनेविषयी ज्यांना आस्था नाही तेच लोक त्याच्या वचनबद्धतेची चर्चा करीत त्याचे अग्रणीही बनू पाहत आहेत. यापेक्षा मोठा विनोद कोणता’ असा सवालही सोनियांनी केला. सेक्युलर शब्दावर हल्ला चढवीत राजनाथसिंहांनी भाषणात डॉ. आंबेडकरांचे गुणगान केले; मात्र राज्यघटनेच्या निर्मितीत स्वातंत्र्य चळवळीचे व पंडित नेहरूंचे योगदान जणू नाममात्रच होते, असे काही ओझरते उल्लेख केले. त्यावर काँग्रेसजनांचा संताप होणे स्वाभाविकच होते.
‘सेक्युलर’चा दुरुपयोग
राजकारणात सेक्युलर शब्दाचा सर्वाधिक दुरुपयोग झाला आहे. त्याचा हिंदी अर्थ धर्मनिरपेक्ष नसून पंथनिरपेक्ष आहे. राजकारणातून धर्मनिरपेक्ष हा शब्दच हद्दपार झाला पाहिजे. आमीरचे नाव न घेता आंबेडकरांचे स्मरण करीत राजनाथसिंह म्हणाले, बाबासाहेबांना आयुष्यात तिरस्कार आणि अपमान सहन करावा लागला, मात्र त्यांनी देश सोडून जाण्याची भाषा केली नाही. त्याानंतर सहिष्णुतेच्या मुद्द्यावरही खडाजंगी होणे क्रमप्राप्तच होते.
घटनेतील मूल्यांवर राजरोस हल्ले
राजनाथसिंह यांच्या विश्लेषणाचा समाचार घेताना सोनिया म्हणाल्या, आजचा दिवस आनंदाचा, तितकाच दु:खाचाही. राज्यघटनेच्या ज्या आदर्शांनी, परंपरांनी आणि सिद्धान्तांनी भारतीय लोकशाहीला वर्षानुवर्षे प्रेरणा दिली त्यावर आज धोक्याची काळी छाया आहे. राज्यघटनेच्या आदर्शांवर राजरोस हल्ले चढवले जात आहेत. काही महिन्यांत आपण सर्वांनी जे पाहिले, जे अनुभवले, ते राज्यघटनेच्या मूळ भावनेच्याच विरोधात आहे. भारतीय राज्यघटनेची निर्मिती हा अनेक दशकांच्या संघर्षाचा इतिहास आहे. या संघर्षाचे नेतृत्व केले होते महात्मा गांधींनी. स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेच्या निर्मितीला ३ वर्षे लागली. प्रारूप तयार केले डॉ. आंबेडकरांच्या समितीने. तथापि इतिहासाची पाने चाळली तर लक्षात येईल की नेहरू, पटेल, डॉ. राजेंद्रप्रसाद, आझादांसह घटना समितीतल्या मान्यवरांच्या विचारांची छाप या दस्तऐवजांवर आहे. यात काँग्रेसचा इतिहास आपोआपच जोडला गेला आहे.