"राहुल गांधींनी लग्न करावं, आम्ही वऱ्हाडी होऊ, तुमची मम्मी...", लालूप्रसाद यादवांच्या विधानानं हशा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 06:02 PM2023-06-23T18:02:29+5:302023-06-23T18:10:06+5:30
opposition party meeting in patna : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी आज बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक पार पडली.
पाटणा : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी बिहारची राजधानी पाटणा येथून विरोधकांनी एकजुटीचा नारा दिला. आज झालेल्या बैठकीत देशातील १५ राजकीय पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेतून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले. अशातच राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी राहुल गांधींचे कौतुक करताना एक विधान केले, ज्याने सर्वांनाच हशा पिकला.
पत्रकार परिषदेत बोलताना लालू यादव म्हणाले, राहुल गांधी सध्या चांगले काम करत आहेत. पण त्यांनी दाढी कमी करायला हवी. तसेच त्यांनी लवकर लग्न करावे, आम्ही वऱ्हाडी म्हणून येऊ. "राहुल गांधींची मम्मी सांगायची की, त्याला लग्न करायला सांगा तो माझं ऐकत नाही", असे लालू यादवांनी म्हणताच एकच हशा पिकला.
मोंदींवर साधला निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना लालू यादव यांनी म्हटले, "आता मी पूर्णपणे तंदुरूस्त असून पंतप्रधान मोदी अमेरिकेत चंदनाचे लाकूड वाटत आहेत. आगामी निवडणूक एकजुटीने लढायची आहे. एकत्र पुढे जायचे आहे. बेरोजगारी आणि महागाईची स्थिती काय आहे? सरकार हिंदू-मुस्लिम युद्ध घडवण्यात गुंतले आहे. वाढती बेरोजगारी काळजीत टाकणारी आहे आणि महागाई शिखरावर आहे. आता हनुमानजी आमच्यासोबत आहेत. भाजपची अवस्था फार वाईट होणार आहे. कर्नाटकात हनुमानजींनी भाजपला झटका दिला आहे. यावेळी भाजपची वाईट अवस्था निश्चित आहे. कारण आता हनुमानजी आमच्यासोबत आहेत."
#WATCH | RJD President Lalu Prasad Yadav after the joint opposition meeting said, "Now I am fully fit and will make Narendra Modi fit...The country's situation is grim at the moment. We will meet again in July in Shimla to prepare an agenda on how to move ahead together while… pic.twitter.com/J3EYnvcLS1
— ANI (@ANI) June 23, 2023
VIDEO | "Rahul Gandhi didn't follow my suggestion earlier. He should have married before. But still it's not too late," RJD supremo Lalu Prasad Yadav quips at Rahul Gandhi after opposition meeting held in Patna.#OppositionMeetingpic.twitter.com/o22ICLTujM
— Press Trust of India (@PTI_News) June 23, 2023
दिग्गज नेत्यांची उपस्थिती
दरम्यान, विरोधकांच्या बैठकीला कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, सीताराम येचुरी, डी राजा यांसह इतरही काही नेत्यांची उपस्थिती होती.