झोमॅटो बॉयचे नाव ऐकताच 'जातीचा' अंदाज लावला, डिलिव्हरी घेण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 11:28 AM2022-06-20T11:28:02+5:302022-06-20T11:29:17+5:30
लखनौच्या आशियानामध्ये ग्राहकाने फूड डिलिव्हरी बॉय विपिनकुमार यांना जात विचारून जेवण घेण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे.
लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका फूड डिलिव्हरी बॉयला ऑर्डर करणाऱ्या ग्राहकाकडून मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विपिन कुमार रावत असं या फूड डिलिव्हरी बॉयचे नाव असून ग्राहकाने त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत त्यांनी आणलेली ऑर्डर घेण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरातील किला मोहम्मदी परिसरात राहणारे रावत हे एका खासगी कंपनीत एसी तंत्रज्ञ आहेत. यासोबतच ते झोमॅटो कंपनीत अर्धवेळ डिलिव्हरी बॉय म्हणूनही काम करतात
लखनौच्या आशियानामध्ये ग्राहकाने फूड डिलिव्हरी बॉय विपिनकुमार यांना जात विचारून जेवण घेण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. विपिन कुमार रावत हे शनिवारी रात्री आशियाना सेक्टर एच येथील अजय सिंह यांच्या घरी जेवणाची ऑर्डर पोहोचवण्यासाठी गेले होते. ऑर्डर देताना दारात आलेल्या एका व्यक्तीने त्यांचे नाव विचारले. त्यांनी, विपिन कुमार रावत असं नाव सांगताच संबंधित ग्राहकाने जातीवाचक शिवीगाळ केली. दलित व्यक्तीच्या हातातील अन्न घेत नाही, म्हणत ऑर्डर रद्द करण्याचे सांगतिले. तर, अंगावर तंबाखु थुंकल्याचा आरोपही डिलिव्हरी बॉयने केला आहे.
रावत यांच्या विरोधानंतर कॉलनीतील स्थानिक 10 ते 12 लोक एकत्र येऊन त्यांनी आपणास मारहाण केली. त्यामुळे, मी माझी दुचाकी जागीच सोडून पळालो, असेही डिलिव्हरी बॉयने म्हटले आहे. रावत यांनी 112 क्रमांकावर फोन करुन पोलिसांना बोलावले. त्यानंतर, पोलिसांनी पीडित व्यक्तीला त्याची दुचाकी परत मिळवून दिली. तसेच, याप्रकरणी आशियाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, डिलिव्हरी बॉय विपिन कुमार रावत यांनी केलेले आरोप ग्राहकाने फेटाळले असून मी थुंकत असताना डिलिव्हरी बॉय मध्ये आल्याचं त्यांनी म्हटले. तसेच, माझ्या घरात स्वयंपाक बनवणारी व्यक्ती दलित आहे, त्यामुळे मी दलित असा भेद करत नसल्याचेही त्यांनी चौकशीवेळी सांगितले.