मुंबई - रंगपंचमीच्या दिवशी हवाई प्रवास करणारे प्रवासी सणाच्या आनंदापासून वंचित राहाणार नाहीत याची काळजी देशातील विमान कंपन्यांनी घेतली. स्पाइस जेटने दिल्ली विमानतळावर म्युझिक शो ठेवला होता, तर इंडिगोने विमानात येणाऱ्या प्रवाशांना रंग लावले. टाटा-सिंगापूर एअरलाईन्सच्या विस्ताराने प्रवाशांसाठी होळीच्या निमित्ताने जेवणामध्ये विशेष मेन्यू ठेवला होता.
दिल्लीच्या टी-1डी एअरपोर्टवर भांगडा तसेच डिजे बॅली सागू आणि पंजाबी गायक जॅझ धामीच्या गाण्यांवर प्रवाशांची पावले थिरकली असे स्पाइस जेटने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार म्हटले आहे. स्पाइस जेटच्या क्रू आणि कर्मचाऱ्यांनी विमानात 'बलम पिचकारी' या बॉलिवूडमधील गाण्यावर विमानात डान्सही केला. स्पाइस जेटच्या कर्मचाऱ्यांनी अरबन सिंगच्या डान्स ग्रुपसह धमाकेदार डान्सही केला. यावेळी प्रवाशीही त्यांच्यासोबत सहभागी झाले होते. संजीव कपूर स्पाइस जेटमध्ये असताना होळीच्या दिवशी बॉलिवूडमधील गाण्यावर डान्सची पद्धत सुरु झाली. संजीव कपूर आता विस्तारामध्ये मुख्य व्यावसायिक अधिकारी आहेत.
केबिन क्रू च्या अशा प्रकारे डान्स करण्यावरुन त्यावेळी वादही झाला होता. डीजीसीएने चिंताही व्यक्त केली होती. विमानातील अशा प्रकारच्या सेलिब्रेशनचे महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी कौतुक केले आहे. त्यांनी टि्वटरव व्हिडिओ अपलोड केला आहे. स्पाइस जेट तुम्ही तुमच्या प्रवाशांच्या आयुष्यात रंग भरले. थोडीशी मस्ती, थोडासा धमाका, आपण सर्वांनी हे उदहारण आचरणात आणले तर आयुष्य अधिक रंगतदार होईल. प्रत्येक दिवस होळीसारखा असेल असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.