सोमवारपर्यंत नाशिकमध्ये कांदा लिलाव सुरू करा अन्यथा परवाने रद्द करू, जिल्हाधिका-यांचा व्यापा-यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2017 12:14 PM2017-09-16T12:14:14+5:302017-09-16T13:34:26+5:30
नाशिकमधील कांदा व्यापा-यांना सोमवारपर्यंत लिलाव सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिलेत. लिलाव सुरू केला नाही तर परवाने रद्द करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
नाशिक, दि. 16 - नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापा-यावर गुरुवारी आयकर विभागाने घातलेल्या छाप्यानंतर लिलावात कांद्याचे भाव सुमारे 30 टक्क्यांनी घसरले होते. त्यामुळे शुक्रवारी काय भाव निघतात, याकडे लक्ष लागून होते, परंतु छाप्यांच्या निषेधार्थ व्यापा-यांनी लिलावांवर बहिष्कार घातल्याने, व्यवहार ठप्प झाले. किरकोळ बाजारात कांद्याचे भाव अद्याप तरी चढेच आहेत. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी सोमवारपर्यंत कांदा लिलाव सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा कांदा व्यापा-यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
जिल्ह्यात कांदा व्यापा-यांवर प्राप्तिकर विभागाने घातलेल्या धाडींचा शेतक-यांना फटका बसला आहे. या धाडसत्राच्या निषेधार्थ व्यापा-यांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद राहिले. मागील चार ते पाच दिवसांपासून कांद्याचे भाव कमी होत असतानाच गुरुवारच्या धाडसत्रामुळे भावातील घसरण अधिक वेगाने झाली.यामुळे कांदा उत्पादकांची चिंता वाढली आहे. मात्र किरकोळ बाजारात कांदा भावात अद्याप कोणताही फरक पडलेला नाही.
गुरुवारी लिलाव झाले असले तरी येवला येथील व्यापा-यांनी शुक्रवार ( 15 सप्टेंबर ) व शनिवार (16 सप्टेंबर ) लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला लासलगाव येथे तर व्यापा-यांनी बेमुदत बंद पुकारल्याने शेतक-यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. वर्षभरापासून गडगडणा-या कांदा दराने अलिकडेच उसळी घेत अल्पावधीत प्रतिक्विंटल अडीच हजारांचा टप्पा गाठला होता. भाव वाढल्याने शेतक-यांनी चाळीत साठविलेला कांदा बाजारात नेण्यास प्राधान्य दिले. शहरी भागात कांदा भावाची ओरड होऊ लागल्याने केंद्र शासनाने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. इजिप्तमधून कांदा आयातीचा निर्णय हा त्याचाच एक भाग. कांदा आयातीची माहिती पसरल्याने बाजार समिती आवारात भाव कमी होतील या धास्तीने शेतकरी मोठ्या प्रमाणात माल बाजारात आणत आहेत.
अचानक आवक वाढल्याने चालू सप्ताहात दर सुमारे ७०० ते ८०० रु पयांनी खाली आले. एकीकडे ही परिस्थिती असताना गुरुवारी प्राप्तीकर विभागाने जिल्ह्यातील चांदवड, येवला, लासलगाव, सटाणा, पिंपळगाव बसवंत, उमराणा येथील बड्या कांदा व्यापा-यांकडे धाडी टाकून चौकशी सुरू केली. या धाडसत्रामुळे गुरुवारी सकाळी बाजार समितीमध्ये आलेल्या कांद्याचे लिलाव झाले नाहीत. दुपारनंतर लिलाव सुरु झाले तरी व्यापा-यांनी थेट 500 रुपये कमी भाव पुकारण्यास सुरुवात केल्याने शेतक-यांचा संताप झाला. काही ठिकाणी लिलाव बंद पाडण्यात आले.
सटाण्यात एकाच वेळी तीन छापे
सटाण्यात आयकर विभागातील अधिका-यांच्या वेगवेगळ्या पथकाने एकाच वेळी तीन ठिकाणी छापे टाकल्याने व्यापा-यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. गुरुवारी (14 सप्टेंबर )सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास येथील कांदा व्यापारी वर्धमान लुंकड यांच्या नाशिक रोडवरील कांदा गुदाम, बाजार समिती आवारातील कार्यालय व निवासस्थानी छापे टाकले. छापेमारीनंतर दिवसभर तपासणी चालूच होती. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून, काही कांदा व्यापा-यांनी खरेदी बंद ठेवली होती.
उमराण्यात व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण
उमराणे येथील कांदा व्यापारी खंडू देवरे यांच्या विठाई आडतच्या कार्यालयावर, नामपूरमध्ये एस. ताराचंद, येवल्यात रामेश्वर अट्टल तर पिंपळगाव बसवंत येथे सोहनलाल भंडारी यांच्या कांदा आडत दुकानावर छापा टाकण्यात आला. दरम्यान आगामी दोन दिवस कांदा मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारीवर्गाने घेतला आहे.
चांदवडला तीन ठिकाणी छापे
चांदवड येथील कांदा व्यापारी व नगरसेवक प्रवीण रामबिलास हेडा यांच्या बंगल्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीतील खळे, लासलगाव रोडवरील खळ्यावर 7 वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाने अचानक धाड टाकली. येवला येथेही आयकर विभागाच्या अधिका-यांनी धाडसत्र राबविले.