हैदराबाद - एकीकडे देशात महामपरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येत आहे. त्यासाठी विशेषत: मुंबईतील दादर चैत्यभूमीवर भीमसैनिकांचा जनसागर उसळला आहे. मात्र, आंध्र प्रदेशातील एका गावात काही अज्ञात समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याची तोडफोड केली आहे. त्यामुळे दलित समाजात रोष निर्माण झाला आहे. तर या घटनेमुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 63 महापरिनिर्वाण दिन आहे. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तर देशाच्या काही भागांतून मुंबईतील दादर चैत्यभूमीवर जनसागर उसळला आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, आंध्र प्रदेशमधील पोडागंतयाडा भागात घडलेल्या या घटनेमुळे अनेकांच्या मनात तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बाबासाहेबांच्या पुतळ्याला भगवा रंग देण्यात आला होता. त्यामुळेही अनेक भीमसैनिकांच्या भावना दुखावल्या होत्या.