लडाखला दिलेला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा चीनला अमान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 04:23 AM2019-08-07T04:23:00+5:302019-08-07T04:23:17+5:30
जम्मू-काश्मीरबाबत एकतर्फी निर्णय घेऊन भारताने तणाव वाढवू नये असा सल्ला चीनने दिला आहे.
बीजिंग : भारताने लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दिलेला दर्जा आम्हाला अमान्य असल्याचे चीनने म्हटले आहे. जम्मू-काश्मीरबाबत एकतर्फी निर्णय घेऊन भारताने तणाव वाढवू नये असा सल्लाही चीनने दिला आहे.जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. तसेच जम्मू-काश्मीरचे विभाजन करून जम्मू-काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले.
या निर्णयाबद्दल चीनने सोमवारी लगेचच प्रतिक्रिया देणे टाळले होते. चीनने लडाखचा भाग असलेला अक्साई चीन बळकावला आहे. अक्साई चीनही भारताचाच भाग असल्याचे ठाम विधान केंद्रीय अमित शहा यांनी लोकसभेत ३७० कलमाबाबतचा प्रस्ताव मांडताना केले होते. त्यावर चीन काय प्रतिक्रिया देतो याकडे भारताचेही लक्ष लागलेले होते.
चीनने म्हटले आहे की, भारत-चीनच्या पश्चिम सीमेवरील काही भूभाग आपला असल्याचा भारताचा दावा आम्हाला मान्य नाही. लडाखबद्दल चीनने हे विधान केले आहे. गेल्या काही दिवसांत भारताने कायद्यांत बदल करून चीनच्या सार्वभौमत्वाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे. असे निर्णय घेऊन सीमाप्रश्नातील गुंतागुंत भारताने आणखी वाढवू नये.