जम्मू- काश्मीर- कुख्यात दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीननं भारतीय लष्करासह जम्मू-काश्मीरमधील पोलिसांना गंभीर इशारा दिला आहे. दहशतविरोधी कारवायांपासून दूर राहा, अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, असा आव्हानच हिज्बुलनं दिलं आहे. हिज्बुलच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना सोडून दिल्याचा दावा केला आहे. हिज्बुलचा कमांडर रियाज नायकूनं सर्व अपहरण केलेल्या लोकांना सोडल्याची माहिती दिली आहे.लष्कराच्या दहशतवादविरोधी मोहिमेत सहभागी होऊ नका, अन्यथा तुमच्या कुटुंबीयांना आम्ही लक्ष्य करू, असा इशारा हिज्बुलच्या दहशतवाद्यांनी काश्मीरमधल्या पोलिसांना दिला आहे. पोलिसांना आपल्या माणसांच्या जाण्याचं दुःख काय असतं हे दाखवून देण्याच्या उद्देशानंच त्यांच्या कुटुंबीयांचं अपहरण केल्याची माहिती नायकूनं दिली आहे. आम्ही जेव्हा ठरवू तेव्हा पोलिसांच्या घरांना लक्ष्य करू शकतो. नायकूनं व्हिडीओच्या माध्यमातून हा संदेश दिला आहे.आमची लढाई पोलिसांशी नाही. पोलीस आम्हाला त्यांच्याशी लढण्यास भाग पाडत आहेत. व्हिडीओ संदेशमध्ये नायकू म्हणतो, आम्ही लोकांना सांगू इच्छितो की, भारत देश हा आपला मित्र नाही आणि आम्हाला शेख अब्दुल्लांकडून धडे गिरवण्याची गरज आहे. भारत काश्मिरी लोकांचं विभाजन करण्याला प्राधान्य देतोय. पोलीस यात मधल्या मध्ये भरडले जातायत. आमचं युद्ध जम्मू-काश्मीरच्या पोलिसांशी नाही. परंतु दुर्दैवानं त्यांचा आमच्याविरोधात वापर केला जातोय. आम्ही तुम्हाला नुकसान पोहोचवू इच्छित नाही. परंतु स्वकीय गेल्याचं दुःख काय असतं, याची जाणीव करून देऊ इच्छितो. काश्मिरी लोकांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःचे प्राण गमावले आहेत. पोलिसांनी काश्मिरी तरुणांचं भवितव्य उद्ध्वस्त करू नये. आमची लढाई पोलिसांच्या कुटुंबीयांशी नव्हे, तर लष्कराशी आहे, असंही नायकूनं स्पष्ट केलं आहे.
दहशतवाद्यांनी काश्मीर पोलीस दलातील सहा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण केले आहे. दहशतवाद्यांनी गुरुवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरमधील पोलिसांच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबीयांचे अपहरण केले. गेल्या काही दिवसांत सुरक्षा दलांनी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेऊन काही दहशतवाद्यांना अटक केली होती. त्या पार्श्वभूमीवर हे अपहरण म्हणजे पोलीस खात्यावर दबाव आणण्यासाठी दहशतवाद्यांनी केलेली खेळी असल्याचे पोलीस खात्यांमधील सूत्रांनी सांगितले.