नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि गाेव्यामधील एका उद्याेगसमुहावर टाकलेल्या धाडीमध्ये १७५ काेटींहून अधिक काळा पैसा खात्याने पकडला आहे. प्राप्तीकर खात्याने तीन दिवसांपूर्वी एका स्टील उद्याेगावर छापे मारले हाेते. महाराष्ट्र आणि गाेव्यासह कंपनीच्या ४४ ठिकाणांवर एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली हाेती. त्याबाबत प्राप्तीकर खात्यातील सुत्रांनी माहिती दिली.
कंपनीकडून भंगार आणि लाेखंडाच्या कच्च्या मालाची बनावट खरेदी दाखविण्यात येत हाेती. ज्या कंपन्यांनी या व्यवहाराच्या बनावट पावत्या दिल्या, त्यांच्या ठिकाणांवरही छापे मारण्यात आले हाेते. त्यांनी या घाेटाळ्याची कबुलीही दिल्याचा दावा प्राप्तीकर खात्याने केला आहे. बनावट पावत्या देउन जीएसटीचाही परतावा या कंपन्यांकडून मिळविण्यात येत हाेता. त्यामुळे या कारवाईमध्ये पुण्यातील जीएसटीचे अधिकारीही सहभागी झाले हाेते. प्राप्तीकर खात्याला सुमारे ४ काेटी रुपयांचा बेहिशेबी अतिरिक्त साठाही आढळून आला आहे.
हैदराबाद येथील एमबीएस समूहाची ३६३ काेटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त
अंमलबजावणी संचालनालयाने हैदराबाद येथील एमबीएस समुहाच ३६३ काेटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी समुहावर ही कारवाई करण्यात आली आहे. हा समुह साेने आणि दागिन्यांच्या व्यवसायात आहे. कंपनीचे प्रवर्तक आणि संचालक सुकेश गुप्ता, अनुराग गुप्ता, नीतू गुप्ता आणि वंदना गुप्ता यांच्यासह इतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. समुहाने एमएमटीसी लिमिटेड या कंपनीची साेने खरेदी व्यवहरात माेठी फसवणूक केली हाेती.
समुहाने कंपनीकडून माेठ्या प्रमाणावर उधारीवर साेनेखरेदी केली हाेती. त्यासंदर्भात कंपनने एमबीएस समुहाविराेधात तक्रार दाखल केली हाेती. सुकेश गुप्ताने बनावट कागदपत्रांच्या आधारे माेठे कर्ज घेउन रिअल इस्टेटमध्ये पैसा गुंतवला हाेता.