नवी दिल्ली - माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केलेल्या व्यक्तिगत टीकेला वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी पहिल्यांदाच नाव न घेता का होईना मार्मिक उत्तर दिले. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना जेटली यांनी सिन्हा यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांच्या सुरात सूर मिळवून सरकारवर हल्लाबोल करणारे दुसरे माजी वित्तमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनाही टोमणे मारले.धोरणांवर बोलण्याऐवजी व्यक्तिकेंद्रित टीका करणारे सिन्हा आज वयाच्या 80व्या वर्षीही मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत व पूर्वी एकमेकांवर तुटून पडणारे सिन्हा व चिदंबरम आज ते विसरून एका सुरात बोलत आहेत, असा जेटली यांच्या अप्रत्यक्ष टीकेचा आशय होता. त्यांच्यासारखा मी अजून तरी ‘माजी’ वित्तमंत्री झालेलो नाही व त्यामुळे मला त्यांच्यासारखे बोलण्याची मोकळीक नाही, असे जेटली म्हणाले.कोणाचेही नाव न घेता परंतु टोला नेमका कोणाला आहे हे स्पष्ट होईल अशा चतुराईने जेटली म्हणाले,‘ मीही त्यांच्यासारखा माजी वित्तमंत्री असतो तर (संपुआ-2च्या काळातील) ‘धोरण लकवा’ मलाही सोईस्करपणे विसरता आला असता. 1998 ते 2002 दरम्यानची बँकांची 15 टक्के बुडित कर्जे ही माझ्या विस्मृतीत गेली असती. 1991मध्ये वारसा म्हणून मिळालेली चार अब्ज डॉलरची चलन गंगाजळीही माझ्या लक्षात राहिली नसती.’! पूर्वी परस्परांवर तुटून पडणा-यांनी आता सुरात सूर मिळविला म्हणून त्याने वस्तुस्थिती बदलत नाही, असेही ते म्हणाले.
अजून तरी मी ‘माजी’ वित्तमंत्री नाही, सिन्हा, चिदंबरम यांच्यावर जेटलींनी साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 10:37 PM