लष्करी रेल्वेतून बॉम्बचा खोका चोरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 04:36 AM2017-08-29T04:36:44+5:302017-08-29T04:38:07+5:30
भारतीय लष्कराच्या महाराष्ट्रातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारातून (सीएडी) दारूगोळा घेऊन पंजाबमधील पठाणकोट येथे निघालेल्या एका विशेष रेल्वेगाडीतून ‘स्मोक बॉम्ब’ (व्हाइट फॉस्फरस) भरलेला एक खोका गहाळ झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
झांशी : भारतीय लष्कराच्या महाराष्ट्रातील पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारातून (सीएडी) दारूगोळा घेऊन पंजाबमधील पठाणकोट येथे निघालेल्या एका विशेष रेल्वेगाडीतून ‘स्मोक बॉम्ब’ (व्हाइट फॉस्फरस) भरलेला एक खोका गहाळ झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
रविवारी दुपारी ही रेल्वेगाडी झांशी स्टेशनच्या बाहेर थांबली असता गाडीतील लष्करी जवानांनी तपासणी केली असता त्यांना एका डब्याचे सील तोडलेले आढळले. अधिक तपास करता त्या डब्यात ठेवलेला ‘स्मोक बॉम्ब’चा एक खोका गहाळ झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रेल्वे पोलिसांचे मंडल अधिकारी शरद प्रताप सिंग यांनी सोमवारी ही माहिती देताना सांगितले की, झांशी रेल्वे पोलिसांत यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. पुलगाव येथून निघाल्यापासून ही रेल्वेगाडी मध्य प्रदेशातील बिना व झांशीदरम्यान अनेक ठिकाणी थोड्या वेळासाठी थांबली होती. कदाचित त्या वेळी ही चोरी झाली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.
शोधमोहीम सुरू
या मालगाडीत दोन-तीन प्रकारचा दारूगोळा होता. शिवाय जवानही तैनात होते. व्हाइट फॉस्फरसला स्टीनलेस लॉक असतात. हे लॉक उघडल्यावर धूर होत नाही. यामुळे चोरट्याला ते पळविता आले. व्हॉइट फॉस्फरसच गेले असल्याने घाबरण्याचे कारण नाही; पण त्या फॉस्फरसचा चोरट्याने गैरवापर करू नये म्हणून शोधमोहीम सुरू आहे.
- संजय सेठी, ब्रिगेडीयर,
सीएडी, पुलगाव