रंगांध विद्यार्थ्यांना मेडिकलचे दार झाले खुले, डॉक्टरकीला बाध नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 02:18 AM2017-09-25T02:18:52+5:302017-09-25T02:19:58+5:30
रंगाधळेपणाची व्याधी असलेल्या आसाममधील दोन विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचा आदेश देऊन सर्वोच्च न्यायालयाने अशा भावी विद्यार्थ्यांसाठीही वैद्यकीय शिक्षणाचे दार खुले केले आहे.
नवी दिल्ली: रंगाधळेपणाची व्याधी असलेल्या आसाममधील दोन विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचा आदेश देऊन सर्वोच्च न्यायालयाने अशा भावी विद्यार्थ्यांसाठीही वैद्यकीय शिक्षणाचे दार खुले केले आहे.
रंगांध असलेल्या प्रणय कुमार पोद्दार व सागर भौमिक या दोन विद्यार्थ्यांनी सन २०१५ मध्ये वैद्यकीय प्रवेशांसाठी घेतलेल्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले होते. खरे तर रंगांध विद्यार्थ्यांना अपात्र ठरविणारा कोणताही स्पष्ट नियम नसूनही त्रिपुरा सरकारचे ड. बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेज आणि मेडिकल कौन्सिलने त्यांना प्रवेशासाठी अपात्र ठरविले होते. स्थनिक उच्च न्यायालयाकडूनही न्याय न मिळाल्याने हे दोघे सर्वोच्च न्यायालयात आले होते.
सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. अमिताव रॉय आणि न्या. अजय खानविलकर यांनी त्रिपुरा मेडिकल कॉलेजने या दोघांना पुढील म्हणजे सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात एमबीबीएसला प्रवेश द्यावा व त्या कॉलेजची त्यावर्षीची प्रवेशक्षमता दोन जागांनी कमी करावी, असा आदेश दिला. सध्याच्या नियमांत असा प्रवेश देणे बसत नसूनही संपूर्ण न्याय करण्यासाठी राज्यघटनेच्या अनुच्छेद १४२ ने दिलेल्या विशेष अधिकाराचा वापर करून हा आदेश दिला गेला.