मोबाइलला रेंज मिळण्यासाठी विद्यार्थी पाण्याच्या टाकीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 12:26 AM2020-08-02T00:26:48+5:302020-08-02T00:27:17+5:30
आॅनलाइन शिक्षण : ओडिशातील दुरवस्था
भुवनेश्वर : कोरोना साथीमुळे शाळांनी आॅनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात तर केली पण ओडिशातील लंदिमाला गावात मोबाइलला नीट रेंज येत नसल्याने ती मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना १५० फूट उंच असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढण्याशिवाय गत्यंतर नसते. काही मुले एखाद्या उंच झाडावर
चढून बसतात. तिथे रेंज मिळाली की आॅनलाइन वर्गामध्ये सहभागी होतात.
ग्रामीण भागात काही जणांकडे मोबाइल, लॅपटॉप अशी साधने नसतात. ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या गावात मोबाइलला नीट रेंज येत नाहीे. लांदिमाला गावही त्याला अपवाद नाही. या गावातील लक्ष्मीधर रौल या दहावीतील विद्यार्थ्याने सांगितले, तो रोज सकाळी जीव धोक्यात घालून पाण्याच्या टाकीवर चढून जातो. तिथे मोबाइलला यथातथाच रेंज मिळते. त्यातही आॅनलाइन वर्गात जितके शिकता येईल तेवढे आत्मसात करण्याचा प्रयत्न असतो. आणखी दहा अकरा मुलेही मोबाइल हातात घेऊन या पाण्याच्या टाकीवर रोज जाऊन बसतात. मालिपूत येथील राजीव गांधी हायस्कूलमधील मुले आॅनलाइन
वर्गात सहभागी होण्यासाठी मोबाइलला रेंज मिळावी म्हणून गावातील झाडांवर चढतात. हे दृश्य आता तिथे रोज पहायला मिळते.
ओडिशात १० टक्के घरांत इंटरनेट
भारतातील २४ टक्के घरांत इंटरनेट कनेक्शन असून हे प्रमाण ओदिशामध्ये फक्त १० टक्के आहे. येथील शाळा बंद असून, लाखो विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्याचा निर्णय तेथील राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी घेतला.