ठळक मुद्दे'केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने राम मंदिर उभारणीला विरोध केल्यास दोन्ही सरकार पाडू'जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका कार्यक्रमात सुब्रमण्यम स्वामी यांनी हा इशारा दिला.स्वामी यांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्यास मुसलमानांचा विरोध नसल्याचा दावाही केला आहे.
नवी दिल्ली - राम मंदिराचा वाद सध्या चांगलाच तापला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने राम मंदिर उभारणीला विरोध केल्यास दोन्ही सरकार पाडू, असा इशारा भाजपाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुब्रमण्यम स्वामी यांनी हा इशारा दिला. 'राम मंदिर उभारणीचं प्रकरण जानेवारीत पटलावर येणार आहे. आम्ही दोन आठवड्यात जिंकू. केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार हे दोन्ही पक्षकार आमचे विरोधक आहेत. मला विरोध करण्याची त्यांची हिंमत आहे का? जर त्यांनी मला विरोध केला तर मी सरकार पाडेन. मात्र ते मला विरोध करणार नाहीत हे मला माहीत आहे', असं स्वामी म्हणाले आहेत.
स्वामी यांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्यास मुसलमानांचा विरोध नसल्याचा दावाही केला आहे. तसेच काही मुस्लिमांशी मी व्यक्तीगत भेट घेतली तेव्हा त्यांनी राम मंदिर उभारणीस विरोध नसल्याचं स्पष्ट केल्याचंही ते म्हणाले. मुघल सम्राट बाबरने ताब्यात घेतलेला हा भूखंड आमचा आहे, असं सुन्नी वक्फ बोर्डाने म्हटलं आहे. पण त्या जागेवर पुन्हा मशीद उभारायची आहे, असं त्यांनी म्हटले नाही, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.