श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन भागात सुरक्षा पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. सुरक्षा पथकांना एकाचवेळी सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळालं आहे. प्रथमच सुरक्षा पथकांनी एकाचवेळी सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
हाजीन चकमकीत हवाई दलाचा एक गरुड कमांडो शहीद झाला असून, दोन जवान जखमी झाले आहेत. अजूनही ही कारवाई सुरु आहे. मागच्या काही महिन्यांपासून लष्कराने काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांविरोधात मोहिम उघडली आहे. आतापर्यंत 80 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना संपवण्यात आले असून, एकाचवेळी इतके दहशतवादी मारले जाण्याची ही पहिली वेळ आहे.
लष्कर-ए-तोयबाला हादरा
जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथील चकमकीत सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. कंठस्नान घालण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांमध्ये जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदचा पुतण्या आणि ‘जमात’चा दुसऱ्या क्रमांकाचा नेता अब्दुल रहमान मक्कीचा मुलगा ओवैदचाही समावेश आहे. ओवैदचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. ओवैद आणि त्याचे साथीदार लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते. ओवैद हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीऊर रहमान लख्वी याचा देखील भाचा आहे. ओवैदचा खात्मा हा लष्कर- ए- तोयबासाठी मोठा हादरा मानले जात आहे.