बालासोर : भारताने गुरुवारी स्वदेशी तंत्रज्ञानातून विकसित केलेल्या पृथ्वी-२ या अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची ओडिशाच्या बालासोर येथे यशस्वी चाचणी घेतली. ३५० कि.मी.पर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची लष्करासाठी प्रायोगिक स्तरावर चाचणी घेण्यात आली.बालासोरच्या चांदीपूर येथील इंटेग्रेटेड टेस्ट रेंगच्या प्रक्षेपण संकुल-३ वरून दुपारी मोबाईल लाँचरद्वारे हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. सामरिक दल कमान द्वारा जुळविण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राचा चाचणी डाटा सकारात्मक परिणाम दाखवीत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपण मार्गावर डीआरडीओचे रडार, इलेक्ट्रो-आॅप्टिकल प्रणाली आणि ओडिशाच्या किनाऱ्यावरील टेलिमेटरी स्थानकांवरून निरीक्षण करण्यात आले. बंगालच्या उपसागरात तैनात एका जहाजावर स्वार असलेल्या डाऊनरेंज पथकाने क्षेपणास्त्राचे लक्ष्य भेदण्याच्या प्रक्रियेची निगराणी केली. भारतीय सशस्त्र दलात २००३ मध्ये सामील करण्यात आलेले पृथ्वी-२ हे डीआरडीओद्वारा देशाच्या एकीकृत गायडेड विकास कार्यक्रमाअंतर्गत विकसित करण्यात आलेले पहिले क्षेपणास्त्र आहे. (वृत्तसंस्था)
पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
By admin | Published: November 27, 2015 12:27 AM