बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या आरोपांना महाठग सुकेश चंद्रशेखरने आता प्रत्युत्तर दिलं आहे. सुकेशने तुरुंगातून जॅकलिनला कोणताही Whatsapp मेसेज किंवा व्हॉइस नोट पाठवली नसल्याचं सांगितलं आहे. सुकेशने जॅकलिनना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, त्याने कायदेशीर मार्गाने आपलं प्रेम आणि भावना जॅकलिनपर्यंत पोहोचवल्या आहेत. जॅकलिनने सुकेशवर सतत Whatsapp आणि व्हॉईस मेसेज पाठवल्याचा आणि तुरुंगात बसून तिला त्रास दिल्याचा आरोप केला होता.
जॅकलीन अलीकडेच दिल्ली पोलिसांकडे काही चॅटचे स्क्रीनशॉट्स देऊन तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती. तिने दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला सांगितलं की, सुकेश तुरुंगातून Whatsapp मेसेज आणि व्हॉईस मेसेजद्वारे त्रास देत होता. सुकेशला हे कृत्य करण्यापासून रोखण्याची विनंतीही तिने मंडोली कारागृहात केली होती. याशिवाय जॅकलिनने या संदर्भात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल करून सुकेशला मेसेज आणि पत्र जारी करण्यापासून रोखण्याची विनंती केली होती.
सुकेशने जॅकलिनला पहिल्यांदा पत्र लिहिलेलं नाही, तर यापूर्वीही त्याने असं अनेकवेळा केलं आहे. सुकेशची पत्र धमकावणारी आणि त्रास देणारी असल्याचं सांगत जॅकलिनने कोर्टात याचिका दाखल केली तेव्हा सुकेशने तिला आव्हानही दिलं. त्याने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अर्ज दाखल केला. त्यात त्याने म्हटलं आहे की, जॅकलिनच्या याचिकेत 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील अनेक तथ्ये लपलेली आहेत. सुकेश 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहे.
अर्जात सुकेशने म्हटलं आहे की, जॅकलिनला पाठवलेल्या एकाही पत्रातून जर मी तिला घाबरवत आहे किंवा धमकी देत आहे असं सिद्ध झाल्यास तसेच ती पत्र आर्थिक गुन्हे शाखा किंवा अंमलबजावणी संचालनालयात सुरू असलेल्या कोणत्याही खटल्याशी संबंधित असल्याचं सिद्ध झाल्यास, मी कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार आहे. गेल्या वर्षी जॅकलीनला अनेक पत्रं लिहिली गेली. मग ती तेव्हा उच्च न्यायालयात का गेली नाही? असा सवालही सुकेशने केला आहे.