नवी दिल्ली - माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या प्रकृती संदर्भातील उलट-सुलट चर्चांचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काँग्रेस नेते शशी थरुर आणि दिल्ली महिला काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात ट्विट करण्यात आले होते. त्यानंतर, अनेकांकडून सुमित्रा महाजन यांच्या प्रकृतीसंदर्भात ट्विट करण्यात आले. त्यामुळे, ट्विटरवर सुमित्रा महाजन यांच्या नावाचा ट्रेंडही सुरू झाला. मात्र, सुमित्रा महाजन यांच्यासदर्भातील ते वृत्त खोटे असल्याचं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे, ही बातमी पूर्णपणे निराधार आणि अफवा असल्याचं स्पष्ट झालंय.
भाजपाचे राष्ट्रीच सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. शथी थरुर यांचे ट्विट रिट्वीट करत ताई एक दम स्वस्थ है.. भगवान उन्हे लंबी उमर दे..! असे कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. त्यानंतर, शशी थरुर यांनी कैलाश यांचे आभार मानले आहेत. तसेच, मी माझे ट्विट डिलीट केलंय, असेही त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर, सोशल मीडियावर पुन्हा ताईंना उंदड आयुष्य लाभो... भगवान उनको लंबी उमर दे... असा सद्भावना आणि प्रार्थन व्यक्त होत आहेत.
सुमित्रा महाजन यांच्या उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो, असेही शशी थरुर यांनी आपल्या नवीन ट्विटमध्ये म्हटलंय.