नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून तूर्त दिलासा मिळाला. महाराष्ट्र पोलिसांना सिंह यांच्याविरोधात चौकशी सुरु ठेवता येईल परंतु आरोपपत्र दाखल करता येणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले. परमबीर यांना अटक न करण्यासाठी कोर्टाने दिलेल्या मुदतीचा सोमवारी अखेरचा दिवस होता.
कोर्टाने स्पष्ट केले की, सिंह यांच्याविरोधातील चौकशी राज्यातील पोलिसांनी नव्हे तर इतर तपास यंत्रणेकडून केली जावी, असे प्रथमदर्शनी दिसते. पण पोलीस त्यांची चौकशी सुरु ठेवू शकतात. सीबीआयने सिंह यांच्यावरील सगळे खटले आमच्याकडे वर्ग केल्यास हरकत नाही, असे कोर्टात स्पष्ट केले. परंतु याला महाराष्ट्र शासनाने विरोध दर्शविला. राज्याचे वकील म्हणाले की, सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल या प्रकरणात साक्षीदार असू शकतात व अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रकरणात ते आरोपी ठरू शकतात. सीबीआय कितपत निष्पक्ष तपास करु शकेल, याबाबत सरकारला शंका वाटते. यानंतर कोर्टाने सीबीआयला याबाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आठवड्याची मुदत दिली.