नवी दिल्ली : नवी दिल्ली : उद्या संध्याकाळी 4 वाजता कर्नाटक विधानसभेत बहुमताची चाचणी घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा, अशी मागणी भाजपाच्या वकिलांकडून न्यायालयाकडे करण्यात आली होती. तर आम्ही उद्याही बहुमत सिद्ध करण्यास तयार आहोत, असा आक्रमक पवित्रा काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी घेतला. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं उद्या 4 वाजता बहुमताची चाचणी घ्या, असा आदेश दिला आहे. त्यामुळे आता भाजपाला बहुमत टिकवण्यासाठी आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी दिला होता. भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं या दिवसांमध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या प्रकरणी काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर आज सुनावणी झाली. यावेळी येडियुरप्पा बहुमत सिद्ध करतील, असा विश्वास भाजपाचे वकील मुकूल रोहतगी यांनी न्यायालयाकडे व्यक्त केला. काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांचा पाठिंबा येडियुरप्पा यांना मिळेल, असंही रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितलं.यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. भाजपाकडून बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिक कालावधी मागितला जात असताना, काँग्रेसच्या वकिलांनी आम्ही उद्याही बहुमत सिद्ध करण्यास तयार आहोत, असा दावा केला. येडियुरप्पा यांच्याकडे किती आमदारांचा पाठिंबा आहे, हे त्यांनी न्यायालयाला सांगावं, असंही सिंघवी म्हणाले. आमदारांवर दबाव असल्यानं त्यांना डीजीपींकडून संरक्षण दिलं जावं आणि बहुमत चाचणीचं चित्रीकरण करण्यात यावं, अशी मागणीदेखील सिंघवी यांनी केली. या दोन्ही मागण्या न्यायालयानं मान्य केल्या.
Live updates:
- आम्हाला अधिक वेळ हवा- रोहतगी
- उद्या बहुमत सिद्ध करु शकत नाही- रोहतगी
- आम्ही उद्याच बहुमत सिद्ध करु- सिंघवी
- बहुमत चाचणीचं चित्रीकरण व्हावं- सिंघवी
- येडियुरप्पा यांच्याकडे बहुमत नाही- सिंघवी
- येडियुरप्पा यांच्याकडे किती आमदारांचा पाठिंबा आहे, ते त्यांनी सांगावं- सिंघवी
- उद्या बहुमत चाचणी झाली, तरी आम्ही तयार आहोत- सिंघवी
- काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांचा पाठिंबा मिळेल- रोहतगी
- येडियुरप्पा बहुमत सिद्ध करतील- रोहतगी
- निवडणुकीआधी काँग्रेस-जेडीएसची युती नव्हती- रोहतगी